खास बात
मेधा इनामदार
एव्हाना जगभरात एआयची वाटचाल खर्या अर्थाने सुरु झाली आहे. लवकरच एआय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे. भविष्यात रोबोट्स आपल्यासोबत आपले सहकारी म्हणून काम करतील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे आपला वेळ आणि श्रम यांची बचत होईल. नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपलं जीवन अधिक सुखदायी होईल. हा बदल कसा आकारला यईल? त्यामुळे कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होईल?
कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय हे शब्द आणि ही संकल्पना आता नवी राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये एआयने मोठ्या झपाट्याने जग काबीज केले आहे. इंजिनिअरिंगची एक नवी आणि लोकप्रिय शाखा बनण्याइतके एआयने नव्या-जुन्या पिढ्यांवर तंत्रज्ञानाचे गारुड केले आहे. सध्या नवीन टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. अवघ्या वर्षभरातच तंत्रज्ञान जुने होते आणि नवीन तंत्रज्ञान त्याची जागा घेते. आजवर फक्त माणूसच करू शकत असलेली कामेदेखील एआय करू शकत आहे. आता मशीनच माणसासारखा विचार करू लागली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात आजारांचे निदान, औषधांचा शोध, शस्त्रक्रिया इत्यादी बाबतीत वित्तीय क्षेत्रात गुंतवणूक सल्लागार, फसवणूक रोखण्यासाठी एआय काम करते तर वाहतूक क्षेत्रात स्वयंचलित वाहने, वाहतूक नियंत्रण, अपघात टाळणे यासाठी याचा वापर केला जातो. ग्राहक सेवाक्षेत्रात चॅटबॉट्स, कस्टमर केअर, जाहिराती बनवणे यासाठी एआय उत्तम काम करते. टेक्स्ट एआय हे सॉफ्टवेअर तर आता जगात सगळीकडे वापरले जाऊ लागले आहे. अगदी विद्यार्थीही याचा सहज उपयोग करतात. हे खूपच दमदार माध्यम आहे, कारण ते सॉफ्टवेअर म्हणते, ‘आस्क मी एनिथिंग! मला काहीही विचारा’. आपण कोणत्याही भाषेत त्याच्याशी संवाद साधू शकतो. मग आपण त्याला निसर्ग आणि मनुष्याच्या नात्यावर कविता लिहायला सांगितली की तो झटपट काव्यनिर्मिती करतो… निसर्गाने सारे दिले ते मनुष्याने हरवले, आता निसर्ग कोपला, आणि मनुष्य जागला…’ वगैरे. आपण एआयला देत असलेल्या आदेशाला ‘प्रॉम्पटिंग’ म्हणतात. अचूक एआय प्रॉम्पटिंग करणे खूप महत्वाचे आहे. कारण प्रॉम्पटिंग जितके परफेक्ट, तितकी निर्मिती चांगली…
एआयमध्ये नव्याने समाविष्ट झालेले डेविन हे सॉफ्टवेअरदेखील तितकेच आश्चर्यकारक आहे. अमेरिकेतल्या कॉग्निशन या कंपनीने हे इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर बनवले आहे. कॉग्निशनने जाहीर केले आहे की जगातला पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांनी तयार केला आहे. त्याचे नाव आहे डेव्हिन. हा डेव्हिन अनेक गोष्टी माणसाच्या मदतीशिवाय करू शकतो. तो कोड लिहितो. कोणतीही समस्या ‘डीबग’ करून ‘प्रो-लेव्हल’ वेबसाइट आणि व्हिडिओ तयार करू शकतो. डेव्हिनमध्ये स्वत:ची अशी एक कमांडिंग यंत्रणा आहे. त्यामध्ये शेल, कोड एडिटर आणि वेब ब्राउझर आहे. त्यामुळे तो इंजिनिअरिंगचे वेगवेगळे टास्क सॉल्व्ह करतो. आश्चर्य म्हणजे डेव्हिनने इंजिनिरअरींग जॉबसाठीचे इंटरव्ह्यूदेखील पास केले आहेत. त्यामुळे तो खर्याखुर्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची जागा घेऊ शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच केरळमधल्या एका शाळेत एका एआय शिक्षिकेचा प्रयोग यशस्वी झाला. केरळच्या तिरुवनंतपुरमच्या केटीसीटी हायर सेकेंडरी स्कूलमध्ये ‘ईरीस’ या फीमेल टीचर रोबोटने विद्यार्थ्यांना शिकवले. साडी नेसून मुलांना शिकवणार्या ‘ईरीस’ मध्ये अनेक वैशिष्ट्ये दिसली. हा रोबोट आणणारी कंपनी ‘मेकरलॅब्स एड्युटेक’ म्हणते, ‘ ईरीस’ ही केवळ केरळमधलीच नव्हे तर देशातली पहिली जनरेटिव्ह एआय टीचर आहे. ईरीस तीन भाषांमध्ये बोलू शकते. तिचां नॉलेज बेस चॅटजीपीटीसारख्या प्रोग्रामिंगने तयार करण्यात आला आहे. एका खर्याखुर्या शिक्षकाच्या तुलनेत तिच्याकडे जास्त माहिती आहे. अर्थात ही माहिती केवळ तिच्या मेमरी कार्डमध्ये कॉपी पेस्ट केलेली आहे. पण तिच्या शिकवण्याची पद्धत फार आवडते, असे विद्यार्थी म्हणतात. ती मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे सखोल उत्तर देते.
ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी काही दिवसांपूर्वीच ‘सोरा’ या नवीन एआय टूलची माहिती दिली. त्यांनी त्यासंबंधीचा व्हिडीओदेखील शेअर केला. ते म्हणतात की ‘सोरा’ काय करू शकते ते तुम्हाला दाखवायला आम्हाला आवडेल. मग लोकांनी त्यांना आपण पाहू इच्छीत असलेल्या व्हिडीओंची माहिती दिली आणि त्याबरहुकूम सोराने व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ अत्यंत खरेखुरे वाटतात. ओपन एआयच्या ‘सोरा’चे वैशिष्ट्य म्हणजे या टूलद्वारे कोणत्याही क्लिप किंवा फोटोशिवाय एचडी व्हिडीओ जनरेट करता येतो. म्हणजे तुम्ही फक्त टेक्स्ट म्हणजेच शब्द- वाक्य दिले की सोरा व्हिडिओ बनवू शकते. सध्या तरी ती एक मिनिटाचा व्हिडिओ बनवते आहे. हे सॉफ्टवेअर अजून सर्वत्र उपलब्ध नाही. पण लवकरच ते होईल. मग जे व्हीडिओ किंवा इमेजेस पूर्वीच उपलब्ध आहेत ते वापरुन ही सोरा अधिक लांबीचे व्हिडिओ बनवू शकेल. तरुण अमिताभ किंवा दिलीपकुमारच्या इमेजेस वापरुन, आधीच उपलब्ध असलेल्या सेट्सच्या इमेजेसचा वापर करून नवीन चित्रपटदेखील बनवता येईल.
आवाजाच्या क्षेत्रातही एआयने स्पर्श केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘कल हो न हो’ हे सोनू निगमने म्हटलेले गाणे साक्षात किशोरकुमारच्या आवाजात व्हायरल झाले. ‘अॅपो असिस्टंट’ हे एक लोकप्रिय अॅप आहे. या अॅपच्या मदतीने कोडिंग, कंटेंट समरी यासारखी कामे करता येतात. हे अॅप यूजरसाठी गणितातील समस्या आणि संगीताची रचनादेखील लिहू शकते. ‘चॅटऑन’ या अॅप्लिकेशनच्या मदतीने लेखन रचना सुधारता येते. यूजर एखाद्या व्यवसायाशी संबंधित असेल आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी चांगला मजकूर लिहायचा असेल तर या अॅपच्या मदतीने हे काम करणे अधिक सोपे झाले आहे. केवळ याच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात एआयने प्रवेश केला आहे. शेतीच्या विकासासाठीही आता याचा वापर सुरू झाला आहे. परवडणार्या ऊसशेतीसाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ आणि अॅग्री पायलट एआय या जागतिक संस्थांच्या सहयोगाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे.
ओपन एआयला उत्तर देण्यासाठी गूगलने जेमिनी नावाचे तंत्रज्ञान आणले आहे. त्यात जेमिनी हे एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे; जे समजून घेणे, सारांश देणे, तर्क करणे, कोडिंग आणि नियोजन करणे यासारख्या कामांमध्ये इतर मॉडेल्सपेक्षा जास्त कामगिरी करते. हे सॉफ्टवेअर प्रो, अल्ट्रा आणि नॅनो या तीन आवृत्त्यांमध्ये सादर केले गेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात सध्या विकसित होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानांमध्ये मुख्यतः गूगल, ओपन एआय, मेटा या कंपन्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा ही लोकांच्या दृष्टीने लाभदायक आहेच. पण त्याचबरोबरच काहीशी भीतीदायकही आहे. या वाढत्या स्पर्धेमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात जबरदस्त क्रांती होणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यात काम करणार्या माणसांची गरज कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षक, चित्रकार, पत्रकार, लेखक, कवी, कॉम्प्युटर ऑपरेटर, टायपिस्ट, बॅनर मेकिंग, व्हिडिओ एडव्हरटाईजमेंट, फोटोग्राफी यासारखे अनेक जॉब आता धोक्यात येऊ शकतात. टेक्स्टचे आवाजात रूपांतर करणार्या तंत्रज्ञानामुळे कथावाचक, रेडिओ वृत्तनिवेदक, व्होकल आर्टिस्ट या मंडळींचे काम कमी झाले आहे. ‘सोरा’सारख्या तंत्रज्ञानामुळे डायरेक्टर, कॅमेरामन, छोटे मोठे तंत्रज्ञ, संवाद लेखक, डबिंग आर्टिस्ट, बॉडी डबल, पटकथालेखक, भव्य दिव्य सेट उभारणारे कला दिग्दर्शक, गायक, गीतकार, संगीतकार, ध्वनी संयोजक, नृत्य दिग्दर्शक यांनाही धोका आहे.
लवकरच संशोधन क्षेत्रातही एआयचा वापर सुरू होईल आणि त्यानंतर काय घडेल याचा अंदाज आताच करणे अशक्य आहे. एआयची वाटचाल आता खर्या अर्थाने सुरु झाली आहे. लवकरच एआय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे. भविष्यात रोबोट्स आपल्यासोबत सहकारी म्हणून काम करतील, अशी शक्यता आहेच. त्यामुळे आपला वेळ आणि श्रम यांची बचत होईल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपले जीवन अधिक सुखदायी होईल. त्यासाठी सभोवताली घडून येत असलेले बदल बारकाईने तपासून पहायला हवेत, हे मात्र नकी.
(अद्वैत फीचर्स)