मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत.

पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले. मात्र, एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे  हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपविरोधात एक शक्तिशाली अंडरकरंट जाणवत आहे. उत्तर प्रदेशसारख्या देशातील इतर भागांमध्येही हा अंडरकरंट जाणवत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *