मावळपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  सांगितले. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर होता, खरा चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे, असेही ते म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार  श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यात चौक फाटा येथे झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, प्रत्येकाला घर, गावागावात पाणी, शाळा, दवाखाना, रस्ता, वीज, शेतीमालाला भाव व रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाला भय, भूक, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवशाही’ आणि प्रभू रामचंद्रांचे रामराज्य आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मावळच्या मतदारांनी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे.

मावळ विधानसभा मतदारसंघात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. पनवेल ते उरण हा आठ पदरी रस्ता पूर्ण झाला आहे. पागोटे ते चौक हा 4,500 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निवडणुकीनंतर सुरू होईल व पुढील एक-दीड वर्षात पूर्ण होईल. या रस्ते विकासाबरोबरच रस्त्यांच्या कडेला लॉजिस्टिक पार्क व इंडस्ट्रियल हब होतील व त्यातून किमान दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल. या नोकऱ्यांमध्ये 80 टक्के जागा या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका राहणार असल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *