जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता.
तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे.
तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.
