बदलापूर : वादळीवाऱ्याच्या पावसानंतर बदलापूर पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेतील वैशाली सिनेमागृह परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजता आग लागण्याची घटना घडली. या आगीत १५ दुचाकींसह सात दुकानांतील तब्बल २० जणांचे स्टॉल जळून खाक झाले. महावितरणच्या रोहित्रामध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग महावितरणच्या दुर्लक्षामुळे लागली असल्याचे येथील गाळाधारकांचे म्हणणे आहे.
बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत वैशाली सिनेमागृह हे शहरातील मध्यवर्ती व गजबजलेले ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकी पार्किंगचा व्यवसाय केला जातो. तर उर्वरित जागेत अनेक व्यावसायिक गाळे आहेत. ज्यात कपडे, चप्पल, मोबाईल कव्हर, ज्यूस सेंटर, फळे व फुले व्यावसायिक अशी सात ते आठ दुकाने होती. याच भागात महावितरणचा भला मोठा रोहित्र आहे. त्यात या रोहित्रामध्ये अनेक दिवसांपासून ठिणग्या उडत होत्या. याबाबतीत अनेकदा महावितरणकडे तक्रार केली होती, असे या गाळाधारकांचे म्हणणे आहे. तसेच सोमवारी (ता. १३) रात्रीदेखील या रोहित्रामधून फटाके फुटल्याचा आवाज आणि ठिणग्या बाहेर पडत होत्या. याबाबत तक्रार देण्यासाठी महावितरण प्रशासनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
मंगळवारी सकाळी सहा वाजता काही स्थानिकांनी या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती प्रशासनाला दिली, ही माहिती मिळताच संबंधित प्रशासन व अग्निशमन दलाला प्राचारण केले. तसेच महावितरणकडेदेखील यासंदर्भात तक्रार केली, मात्र महावितरणने कॉल उचलेपर्यंत वेळ निघून गेली होती, अशी खंत येथील गाळेधारकांनी व्यक्त केली. तसेच बाजारात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रोहित्र असू नये, यासाठी आम्ही वारंवार महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र याकडेही महावितरणने अजूनपर्यंत लक्ष दिले नसल्याचे म्हटले. या संपूर्ण आगीत गाळेधारक व दुचाकीस्वार असे मिळून ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा नुकसानग्रस्तांनी केला आहे. तसेच याची नुकसानभरपाई, महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कचऱ्याला लागलेली आग रोहित्रापर्यंत पोहोचली, त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. गेली अनेक वर्षे हा रोहित्र याच ठिकाणी आहे. जेव्हा कधी त्यात तांत्रिक बिघाड निर्माण होतो, त्यावेळी वेळीच लक्ष देऊन दुरुस्तीचे काम केले जाते. ही आग गाळेधारकांच्या निष्काळजीपणामुळे लागली आहे. त्याचबरोबर सध्या आम्ही या रोहित्रामधील जोडणी इतर ठिकाणी वळवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच या ठिकाणी ही आग कशामुळे लागली याचा तपासदेखील होणार आहे.
-चांगदेव काळे, उपअभियंता, महावितरण, बदलापूर
आम्ही वीस ते पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. येथे असलेल्या अनेक व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. आमचा संसारदेखील याच ठिकाणी असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रोहित्राबाबत महावितरणकडे, आम्ही तक्रारी केल्या आहेत; मात्र महावितरणने या तक्रारींकडे कधीही सोयीस्कररीत्या लक्ष दिलेले नाही. पावसानंतर रात्री या ठिकाणी अनेकदा फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते. यासंदर्भातील आम्ही व्हिडीओदेखील आहेत. रात्री यासंदर्भात तक्रार देण्यासाठी महावितरणला सतत कॉलही केले, मात्र महावितरणकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही.
-निहाल मलिक, व्यावसायिक