मुंबई : राज्यात पक्षामधील फाटाफूट, बदलत्या वैचारिक, राजकीय भूमिका यामुळे झालेला वैचारिक गोंधळ हा १८ ते २३ या वयोगटातील नवमतदारांच्या पचनी पडलेला दिसत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी होत असलेले पक्षांतर, काही क्षणात बदलेल्या वैचारिक भूमिका हे राज्यासाठी काही नवीन नाही. मात्र हा राजकीय गोंधळ तरुणाईच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे यावेळी मतदान करायचे, पण ते ‘नोटा’ला करू, अशा भावना या नवमतदारांकडून व्यक्त होत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात ३० हजार आणि उपनगर जिल्ह्यात सुमारे ८० हजार नवमतदारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. पहिल्यांदा मतदान करणारा हा तरुण वर्ग मतदानासाठी उत्साही आहे. तसेच निवडणूक आयोगही नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून शाळा-कॉलेज, सोशल मीडियातून आवाहन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या नवख्या मतदारांना राज्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट फारशी भावली नाही. नवमतदारांच्या बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबईत तर एकाच पक्षातील सहकारी असलेले एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’ ला मतदान करत आपली नाराजी दाखवण्याची मानसिकता या तरुणांची असल्याचे दिसत आहे.

नाराजीचे प्रतिबिंब

आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यास कोणाला मतदान करायचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहायचा. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ‘नन ऑफ द अबाव्ह’ (नोटा) म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही, हा पर्याय दिला होता. त्यामुळे अनेक मतदार हा पर्याय निवडताना दिसतात. दरम्यान, नोटाला मिळालेली मते कुठेही ग्राह्य धरली जात नसली तरी मतदारांना नाराजी व्यक्त करण्याचा एक ठोस पर्याय आहे. यंदा २०१९ च्या तुलनेत नोटाला जास्त मते मिळतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *