मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा २,७३५ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी २,२९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
असे असते मतदान पथक
मुंबई उपनगर जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या २,७३५ एवढी आहे. या मतदारांच्या घरी मतदान पथके पाठवून टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांच्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान पथकांमध्ये एक मतदान अधिकारी, त्याचा सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलिस, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.
सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण
नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाच्या वेळापत्रकाची माहिती संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार अशा मतदान पथकांसमवेत त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या वेळी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित ठेवू शकतात. गृहमतदानाच्या वेळी मतदाराच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेऊन या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात येत आहे