मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्मिळ झाडांच्या प्रजाती आहेत. या प्रजातींची ओळख बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) नुकतीच केली आहे. बीएनएचएस ही संस्था नैसर्गिक वारशाचा अभ्यास, संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या ‘ट्री वॉक’ या उपक्रमामधून अनेक दुर्मिळ प्रजातींची ओळख पटल्याचा आनंद झाल्याचे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांना सांगितले.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या भारतातील प्रमुख वन्यजीव संशोधन संवर्धन संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात नुकताच ट्री वॉक हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बीएनएचएस सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने बागेतील समृद्ध फुलांची विविधता पाहण्याची अनोखी संधी सदस्यांना उपलब्ध झाली.

बीएनएचएसच्या सदस्यांनी बागेचे निरीक्षण केले असता, तेथे त्यांना विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी झाडांच्या प्रजाती नजरेस पडल्या. प्रत्येक झाडाची स्वतःची अनोखी कथा आणि महत्त्व आहे. ट्री वॉकचे नेतृत्व सेंट झेवियर कॉलेजमधील सहायक प्राध्यापक डॉ. राजदेव सिंग आणि निवृत्त प्राध्यापक मानेक मिस्त्री यांनी केले. प्रो. सेंट झेवियर कॉलेज, स्वीडल सेरेजो, बीएनएचएस प्रोग्राम्स विभागातील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि शिक्षक आसिफ खान यांनी सांगितले की, आमच्या राणीबाग येथील ट्री वॉकला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला, बीएनएचएस ट्री वॉक मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात आणि आजूबाजूला अशा निसर्गभ्रमणाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे.

उपक्रमात १७ सदस्यांचा सहभाग

राणी बागेच्या प्रवेशद्वारावरील जुन्या बाओबाब ट्री येथून झाडांचे निरीक्षण करत बीएनएचएसच्या १७ सदस्यांनी ‘ट्री वॉक’ला सुरुवात केली. सदस्यांना मॅजेस्टिक हेवन लोटस ट्री, कॅन्डल ट्री, प्राईड ऑफ इंडिया ट्री, वीपिंग पेपरबर्क, एलिफंट ॲपल आणि अगदी चॉकलेट किंवा कोकाओ ट्रीसारखी अनेक दुर्मिळ झाडे दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *