ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली.
स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. रणविजय ढोल पथक, सारजी लेझीम पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळेस आयोजक प्रफुल वाघोले यांनी, ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंतील उत्सव साजरा करण्यात आला आहे. काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजी राजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले. या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे, नितीन लांडगे, रविंद्र कोळी, विजय त्रिपाठी, जितेंद्र यादव, रामानंद यादव, संतोष राणे, निलेश हातणकर, महेश मोरे संतोष मोरे, गजानन चौधरी, अनिल नलावडे चेतन शिंदे, शिवाय एगडे, प्रतिभा शिर्के, सुभाष देवरे आदींनी मोलाची भूमिका बजावली होती.
