नाशिक : सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे एकनाथ शिंदेची पांडव सेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कौरव सेना आहे. आपल्याला आता या कौरव सेनेविरुध्द धनुष्य उचलायचे आहे, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारती पवारांना मोठे मताधिक्य द्या. नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहे ते सर्व मार्गी लावण्याचे काम मी करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी केले. पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे आणायचे आहे. त्यासाठी 60 ते 70 हजार कोटी रुपयांचे नियोजन आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्वांचा पाणी प्रश्न मिटवायचे आहे.
आपल्याला देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचा आहे. आपल्या विकासाच्या गाडीचे इंजिन मोदी आहे. या गाडीला वेगवेगळे नेते डबे जोडले आहे. सर्वांना घेवून विकासाची गाडी ही पुढे सुरू आहे. दुसरीकडे राहुल गांधी, शरद पवार, मायावती हे सगळेच म्हणतात आम्ही इंजिन आहे. त्यांच्या गाडीला डबेच नाही. सोनिया गांधींच्या इंजिनमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आहेत. शरद पवार यांच्या इंजिनात सुप्रिया सुळेंसाठी जागा आहे. उध्दव ठाकरे यांच्या इंजिनात आदित्य ठाकरे यांची जागा आहे. सर्वसामान्यांना यांच्या गाडीत जागा नाही. अशी टीकाही फडणवीस यांनी केली. कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरण राबविणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
