० बीडमध्ये मराठा आक्रमक
० दगडफेकीमुळे तणाव
० जरांगेचा सरकारला इशारा
बीड : लोकसभा निवडणूकीत गावात येऊन भाजपाला मतदान का केले, अशी विचारणा करून अशोक राऊतमारे यांच्या घरावर सहा जणांनी दगडफेक करून तलवारीने हल्ला केला आहे. बीड शहरातील नांदुर घाट गावात पिंपरगव्हाण रोडभागातील दत्तधाम पाटी येथे ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता शंभर ते दीडशे मराठा आंदोलकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप पीडीत कुटुंबाने केला आहे.
या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ज्ञात 7 जण आणि अज्ञात 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये विनयभांगचे कलमदेखील लावण्यात आले आहे.
दरम्यान बुधवारी रात्री याच प्रकरणातून दोन गटांमध्ये पुन्हा दगडफेक झाल्याचे देखील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करून रात्रीच तणाव शांत केला. यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
नांदूर घाट गावात झालेल्या दगडफेकीमध्ये काही तरुण देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची पोलीस तक्रार नोंदवून घेतली जात नाही, गुन्हा दाखल केला जात नाही असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे.
मेलो तरी मागे हटणार नाही- जरांगे
बीडमधील नांदूरघाट गावात दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी हल्लेखोर, हल्लेखोरांना पाठिशी घालणारे नेते आणि सत्ताधाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांन मी सांगेन की राज्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवा. तुमचे कार्यकर्ते मला धमक्या देत आहेत. पण तुम्हाला देखील महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा. मला धक्का जरी लागला तरी लक्षात ठेवा माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला खंबीर आहे. त्यामुळे मी देखील मागे हटणार नाही. मी मेलो तरी मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय, मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे म्हणाले, “काही लोकांना कळून चुकलंय की हा माणूस (मनोज जरांगे) मराठ्यांना, दलितांना, मुस्लिम बांधवांना, १२ बलुतेदारांना १०० टक्के न्याय देऊ शकतो. त्यांना माहिती आहे की हा माणूस त्यांना सत्तेतून उतरवू शकतो, तसेच त्यांच्या हातात सत्तादेखील देऊ शकतो. हे त्यांना कळलंय म्हणून आता ते माझ्या मागे लागले आहे. म्हणूनच हे हल्ले होतात, या सगळ्याला मराठ्यांचे नेते देखील कारणीभूत आहेत.”
