मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: घामटा काढला. सकाळपासूनच उष्ण वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट हवामानामुळे मुंबईकरांची सतत घामाच्या धारेने आंघोळ होत असल्याचे चित्र होते.
यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक नोंदविण्यात येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. शिवाय उष्णतेच्या लाटांचे दिवसही तुलनेने अधिक नोंदविले जातील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार, एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने मुंबईकरांना हैराण केले होते. मे महिन्यात उष्णतेच्या लाटांसोबत उष्ण, दमट हवामानाचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र आता मान्सून तोंडावर आला तरी उष्णतेच्या लाटा, उष्ण व दमट हवामान कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.
