दोन कॉलम उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई: शिवाजीपार्कवर शुक्रवारी होणारी मोदींची सभा ही पंतप्रधान म्हणून त्यांची शेवटची सभा असणार आहे. ‘गुडबाय’ मोदी अशीच ही सभा असणार आहे असा हल्लाबोल करीत ४ जून नंतर नरेंद्र मोदीं हे पंतप्रधान राहणार नाहीत, ४ जून नंतर ते झोळी घेऊन निघून जातील, नंतर तुमचं काय होणार असा सवाल शिंदेना करीत ४ जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.
सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, आदर्श घोटाळा झाल्याचा आरोप, इक्बाल मिर्ची आणि विमान घोटाळा असे अनेक आरोप कोणी केलेले? तर नरेंद्र मोदींनीच, आता त्यांनाच मोदींनी सोबत घेतलं आहे. मोदींच्या मेंदूला क्षीण आलेला आहे. 4 जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. मोदींना आता 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे भाजपकडे दुसरा चेहरा नाही. गेल्या 10 वर्षात तर भाजपने नेतृत्व तयार केलं नाही. 400 पार म्हणत असाल तर तुम्ही इतर पक्ष का फोडताय? असा सवालही ठाकरे यांनी केला.
भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. घाटकोरपमध्ये दोन दिवसांपूर्वी दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. लोकांना कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली. त्यामुळे लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड आक्रोश आहे.”
आम्हाला नकली शिवसेना म्हणत असाल तर महाराष्ट्रात एवढ्या सभा का घेता असा सवाल उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विचारला. औरंगजेब महाराष्ट्रात 25 वर्षे होता, आता मोदीही उद्या 25 वी सभा महाराष्ट्रात घेत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राने त्यांना गुढघे टेकायला लावले आहेत.असेही ठाकरे म्हणाले.
