पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी

माथेरान : दरवर्षी माथेरान मध्ये अडीचशे ते तीनशे इंच पावसाची नोंद होते. अतिवृष्टीमुळे नेहमीच रस्त्यावर पावसाळी पाणी वाहून जात असल्याने रस्त्यांची वाताहत होते यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने माथेरान या अतिसंवेदनशील क्षेत्रात रस्त्याची धूप थांबविण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गावातील अनेक ठिकाणी सुरुवातीला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते त्यानंतर दस्तुरी ते पांडे रोड पर्यंतच्या मुख्य मार्गावर धुळीमुळे व्यापारी वर्गाचे दुकानातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान व्हायचे यासाठी हा मुख्य रस्ता धूळविरहित करण्यासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून काम सुरू केले होते परंतु अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामावरसुध्दा नेहमीप्रमाणे आक्षेप घेण्यात आल्यामुळे हे महत्वपूर्ण काम अर्धवट स्थितीत आहे. नुकताच सांडपाणी प्रक्रिया कामी रस्त्यांची खोदाई करून मलनिस्सारण पाईप लाईन टाकण्यात आली आहे.हे रस्ते खोदताना जे काढलेले पेव्हर ब्लॉक होते ते पुन्हा लावू नये असा पवित्रा  विकासाला विरोध करणाऱ्या गावातील काही मंडळींनी घेतला होता.त्यामुळे जर का ह्या खोदलेल्या रस्त्यांवर काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक लावले नसते तर आगामी काळात अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराघरात पावसाळी पाणी जाऊन वित्तहानी झाली असती याकामी गावातील अन्य काही अभ्यासू,गावाचे हित पाहणाऱ्या लोकांच्या आग्रहास्तव हे रस्ते अबाधित राहण्यासाठी, गावाची सुंदरता टिकून रहावी धुळीचे साम्राज्य पसरू नये यासाठी संबंधीत ठेकेदाराला सूचित केल्यावर रस्ते पूर्ववत करण्यात येत आहेत. सनियंत्रण समितीने मुख्य रस्त्यावरील नवीन क्ले पेव्हर ब्लॉकचा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्याने ब्लॉकचे नवीन काम बंद केले आहे.

काही राजकीय पक्षांची मंडळी येथील काही भोळ्या भाबड्या लोकांना हाताशी धरून आतापर्यंत जी जी विकासकामे झाली आहेत त्यास केवळ आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी विकासाला विरोध करत आहेत. परंतु राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या वतीने येणाऱ्या विकासकामांला नाहक विरोध करून सर्वसामान्य लोकांचे आणि भावी पिढीला अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरत आहेत. जर इथल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावात पर्यटन क्रांती घडवायची असेल तर विकास कामांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. श्रेयवादामुळे आर्थिक लाभासाठी झटणारी काही मंडळीना गावाबद्दल काहीही सहानुभूती नसून आपला स्वार्थ कसा साधता येईल याकडेच त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. असे सूर सर्वत्र स्थानिकांमधून  ऐकावयास मिळत आहेत.

——————————————————-

क्ले पेव्हर ब्लॉक ही माथेरानचे रस्ते बनविण्याकरिता काळाची गरज आहे. दर वर्षी माथेरान मध्ये जास्त पाऊस होत असल्यामुळे रस्ते वाहून जात होते याचा विचार करून मॉनेटरिंग कमिटीने क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु अर्धा रस्ता झाल्यानंतर या ब्लॉकला विरोध होतोय. दगड मातीचे रस्ते बनविन्याकरिता मोठया प्रमाणात दरवर्षी दगड माती उपलब्ध  होत नसल्याने भविष्यात  माथेरानचे संपूर्ण रस्ते बनविण्याकरिता क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय उरलेला नाही.

वसंत कदम—-अध्यक्ष शिवगर्जना मित्र मंडळ माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *