ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. २०) होणारे मतदान भयमुक्त आणि शांततेत पार पडावे, यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे. स्वतःच्या हक्काच्या फौजफाट्यासह जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिसांची कुमक मदतीला मागवली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, नाशिक, पुणे आदी पोलिसांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत विविध पक्षांचे मोठे नेते ठाणे, मुंबईत प्रचाराला आले. आता या मतदारसंघात इतर जिल्ह्यांतील पोलिसदेखील दाखल झाले आहेत. ठाणे, मुंबईत शिगेला पोहोचलेला प्रचार आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नयेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयात जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिस कुमक मागवण्यात आली आहे. त्यामध्ये तीन पोलिस उपायुक्त, नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ पोलिस निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह आठ हजार पोलिसांचे संख्याबळ आहे.
राखीव पोलिसांच्या २५ कंपन्या तैनात
ठाणे ग्रामीण पोलिसांचेही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या मदतीला असणार आहेत. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्रँगरूमच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणार आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पाेलिसांच्या २५ कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत १२० कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फाैजफाटा यात राहणार आहे.
असा असेल पहारा
ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात आहे.
परिमंडळ दोन भिवंडीत सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या तैनात आहेत.
परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीणची एक अशा पाच कंपन्या तैनात आहेत.
उल्हासनगर परिमंडळमध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या आहेत.
वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय, ठाणे, कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत.
