भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील कामगार राहत आहेत. कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार सोमवारी (ता. २०) मतदान करणार आहेत. मात्र, लाखोंच्या संख्येने असलेले अस्थायिक कामगार मतदानापासून वंचित राहणार आहेत. कारण या कामगारांना गावीसुद्धा जात येत नसल्याने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.

भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण हे तीन विधानसभा मतदारसंघ भिवंडी शहर आणि परिसरात येत आहेत. या मतदारसंघाच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने यंत्रमाग, सायझिंग, डाईंग, मोती कारखाने, गोदाम, औद्योगिक कारखाने आणि छोटे-मोठे व्यवसाय आहेत. या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार येथील सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यांचे स्थायी राहण्याचे ठिकाण नसल्याने त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. परप्रांतीय असल्याने काही कामगारांची नावे गावी नोंदवलेली आहेत. मात्र, त्यांना तेथेही जात येत नसल्याने नेहमी मतदानापासून वंचित राहतात.

अनेक कामगार वर्षानुवर्षे काम करूनही रोजंदारी कामगार म्हणून त्यांची गणती होत असते. तर काही कामगारांची कायमस्वरूपी नोकरी असली, तरी या सर्व प्रकारच्या आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपगारी रजा मिळत नाही. या दिवसाचा पगार दिला नाही, तर सरकारी स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील मालकवर्ग निर्ढावलेले आहेत. त्यामुळे अशा मालकांवर निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार काय? अशी विचारणा कामगारांकडून होत आहे.

भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात काम करणारे आणि येथे कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार मतदान करणार आहेत. मात्र, काही अस्थायिक कामगारांना मतदान करता येत नाही. असे अनेक कामगार विविध ठिकाणी काम करत आहेत. त्यांना यंत्रमाग मालक मतदानासाठी सुट्टी देत नाही. त्यासाठी मालकाचे नावही कामगारास माहिती नसते. अनेक वर्षांपासूनची ही शोकांतिका आहे.

– विजय कांबळे, लाल बावटा असंघटित कामगार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *