मतदारांत तीव्र संताप

दिवा : दिव्यातील मतदारांचे नेहमीचे मतदान केंद्र बदलल्याने नाराजीचा सूर आहे. दिव्यातील गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांचे मतदान ते स्वतः रहात असलेल्या ठिकाणापासून नेहमी लांब येत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दर निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्र बदलल्याने नागरिकांची मतदान केंद्रावर पोहोचायला दमछाक होताना दिसत आहे.

दिव्यातील स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या दिवा पश्चिम भागातील नागरिकांना दिवा पूर्वेतील शाळांमधील मतदान केंद्र आल्याने तेथे त्यांना पोहोचणे आज जिकरीचे झाले. दिव्यातील किमान 20 ते 30 टक्के नागरिकांना दर निवडणुकीला मतदान केंद्रे ही बदलून आल्याने दिव्याचा मतदानाचा टक्का हा वाढत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना त्यांच्या घरापासून 1 ते 2 किलोमीटर पायपीट करुन मतदान केंद्रावर पोहोचावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संथ्येच्या निवडणुकीच्या वेळी नागरिकांची मतदान केंद्रावर पोहोचणे म्हणजे एक दिव्य असल्याचे नागरिक सांगतात. प्रत्येक वेळी आमचा राहता पत्ता बदलून येतो, नावात चुका असतात, फोटो चुकीचे असतात तर निवडणूक कार्डावर लिंग बदल ही झालेला असतो. किती ही वेळा चुका दुरुस्त केल्या तरी निवडणूक कार्डामध्ये बदल होत नाही. तसेच 5 ते 6 वेळा मतदानाचा फोर्म भरला तरी मतदान कार्ड येत नाही. आले तर ते चुकीचे येते. हा सर्रास प्रकार होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.

आज दिव्यातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बरीच पाटपीट करावी लागली. दिवा पश्चिमच्या नागरिकांना मतदानासाठी दातिवली, मुंब्रा देवी कॉलनी, नॅशनल शाळा आणि दिवा हायस्कूलला जावे लागले. तर दातिवलीतील नागरिकांना दिवा पश्चिमच्या पालिका शाळेत, मुंब्रा देवी कॉलनी तर दिवा हायस्कूल पर्यंत तंगडतोड जावे लागले. त्यामुळे काही नागरिकांनी मतदान न करणे ठरवले तर काहिंनी निवडणुक आयोगा विरोधात नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *