भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत ३७.५६ टक्के मतदान झाले होते. सकाळी पहिल्या तासात मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली. त्यामुळे नऊ वाजेपर्यंत मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात अवघे ६.१४ टक्के मतदान झाले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास लोक घराबाहेर पडले. भाईंदर पश्चिम, मिरा रोड, भाईंदर पूर्व आदी भागांतील अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या. त्यामुळे नऊ ते एक या चार तासांत मतदानाची टक्केवारी वाढून एक वाजेपर्यंतचे एकूण मतदान २८.३९ टक्के झाले. दुपारच्या कडक उन्हाचाही मतदानाच्या टक्केवारीवर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत मिरा-भाईंदर मतदारसंघात ३७.५६ टक्के मतदान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी अचानक मिरा-भाईंदरचा दौरा केला. या वेळी शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून माहिती घेतली.

वरिष्ठ नागरिक व नवमतदारांमध्येही उत्साह दिसून आला. मिरा रोड येथील ९१ वर्षीय हेमलता छेडा या व्हीलचेअरवर बसून मतदान केंद्रात पोहोचत मतदान केले. मतदान केंद्रावर वरिष्ठांसाठी चांगली सुविधा होती. मतदान कर्मचारी, तसेच पोलिस कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया मतदानानंतर छेडा यांनी व्यक्त केली. नवमतदारही मतदानासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. तरुण पिढीच्या भविष्यासाठी मतदान केले, असे पहिल्यांदाच मतदान करणारे तक्षील मेहता यांनी सांगितले.

उत्तन भागात सकाळच्या सत्रात केंद्रांवर तुरळक गर्दी होती. सध्या मासेमारी अंतिम टप्प्यात आहे. त्यातच सकाळच्या वेळी मच्छीमार मासळी घेऊन आल्याने ती उतरवण्यासाठी मच्छीमार, तसेच महिला वर्गाची गडबड उडाली होती. दहा वाजल्यानंतर मात्र मच्छीमार समाजही मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडला.

मोबाईलमुळे नोकरदारांची पंचाईत

मतदान केंद्रांबाहेर पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. दिव्यांग अथवा वरिष्ठ नागरिकांना घेऊन येणाऱ्या वाहनांचा अपवाद वगळता अन्य कोणतेही वाहन मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरापर्यंत आणण्यास मनाई केली जात होती. त्याचप्रमाणे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यासही मनाई करण्यात येत होती. परिणामी, मतदान करून परस्पर कामावर जाणाऱ्या मतदारांची चांगलीच पंचाईत झाली. सध्या उन्हाची तीव्रता खूपच जास्त आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर अनेक ठिकाणी रांगेत उभ्या राहणाऱ्या मतदारांसाठी मंडप उभारण्यात आले होते. त्यामुळे मतदारांना दिलासा मिळाला.

याद्यांतून अनेक मतदार गायब

मतदार याद्यांमधील घोळ यावेळीही कायम असल्याचे दिसून आले. यादीत नावे सापडत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. याबद्दल काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मतदान केले आहे व जे आहेत, त्याच पत्त्यावर राहतात अशा अनेक मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब झाली आहेत. यामागे काही विशिष्ट हेतू आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. मतदानाची प्रक्रियाही संथ गतीने सुरू असल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागल्याची माहिती हुसेन यांनी दिली.

दुसऱ्या परिसरात नावे

काही ठिकाणी मतदार ज्या भागात राहतात, त्या भागातील मतदान केंद्रात त्यांचे नाव न येता दुसऱ्याच ठिकाणी नाव समाविष्ट करण्यात आले होते. भाईंदर पश्चिम येथील विनायक नगर येथील काही मतदारांची नावे तब्बल नऊ किमी अंतरावरील उत्तनमध्ये, तर उत्तनमधील मतदारांची नवे मिरा रोड येथे आल्याने मतदारांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला, तर काही जणांनी मतदानाला जाणे टाळले.

कार्यकर्त्यांकडून मदत

अनेक मतदारांना निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या मतदान चिठ्ठ्या न मिळाल्याने आपले मतदान नेमके कुठे आहे, याचीच माहिती मिळत नव्हती. मात्र, मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने संकेतस्थळ, तसेच मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ज्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र आहे, त्यांचे नाव शोधणे सोपे होत होते. बहुतांश राजकीय पक्षांच्या बुथवर कार्यकर्ते मोबाईल अथवा लॅपटॉपद्वारे मतदारांचे नाव शोधून देत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *