दखल

डॉ. टी. आर. गोराणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आणि खुनाला कारणीभूत असणारे सूत्रधार शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या लक्षात आले होते. त्यासाठी संघटनेने जिल्हा प्रशासनापासून राज्य तसेच केंद्र सरकारपर्यंत प्रत्यक्ष भेटी देत अनेकांशी पत्रव्यवहार केला. मात्र तरीही सत्ताधार्‍यांनी यात विशेष लक्ष घातले नाही, असा कटू अनुभव आहे. या खटल्याच्या ताज्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध.

समाजातील प्रत्येक व्यक्ती विवेकी विचारांची घडावी यासाठी आणि विवेकी समाजव्यवस्थेकडे समाजाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या विचाराने प्रेरित होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी काही समविचारी सहकार्‍यांसमवेत नऊ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यात ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ची स्थापना केली. महाराष्ट्र अंनिस म्हणजे चमत्कार करणार्‍या बुवाबाबांचा भांडाफोड करणारी चळवळ, अशीच सुरुवातीला ओळख होती. त्यामुळे थोड्याच कालावधीत अंनिसला महाराष्ट्रात मोठा नावलौकिक प्राप्त झाला. विविध धर्मातील अंधश्रद्धांचा शोध घेऊन निर्मूलन करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध धर्मांमधील सर्व सण, उत्सव, समारंभ यांची कालसुसंगत, विधायक तसेच कृतिशील चिकित्सा करणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व सण, समारंभ, उत्सवांची कृतिशील चिकित्सा करून, कार्यकारणभाव तपासून फोलपणा उघड करणे, जास्तीत जास्त सण, उत्सव, समारंभांना पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त करुन देण्याचे कार्यक्रम, उपक्रम अंनिसने अगदी सुरुवातीच्या काळापासून सुरू केले. त्यामुळे साहजिकच प्रत्येक धर्मातील अशा सर्वच सण-उत्सवांची चिकित्सा करणे सुरू झाले. हीच बाब डॉ .नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला कारण ठरली, अशी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांसह अनेकांची पक्की भावना आहे. कोणताही धर्म वाईट उपदेश करत नाही; पण त्यात धर्मांधता, धर्मकट्टरता वाढली की विकृत स्वरूप प्राप्त होते. कोणत्याही धर्मात जाणीवपूर्वक पुरोहितशाही, कर्मकांडे घुसडवली जातात, तेव्हा त्यातून शोषणाचे विविध मार्ग प्रशस्त होत जातात. देवाधर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली केल्या जाणार्‍या शोषणाला ‘अंनिस’ सातत्याने विरोध करत आली.
देवाधर्माच्या, अध्यात्माच्या नावाखाली उदरनिर्वाह जोपासणार्‍या, सातत्याने समाजाच्या गळी मारणार्‍या अंधश्रद्धा सुरू ठेवणार्‍यांना महाराष्ट्र अंनिसची नेहमीच भीती वाटत आली आहे. म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखे प्रभावी संघटनकौशल्य असणारे नेतृत्व कायमचेच संपवले तर महाराष्ट्र अंनिस संपुष्टात येईल, नेस्तनाबूत होईल, कार्यकर्ते घाबरतील, मनात भीती निर्माण झाल्याने सैरभैर होऊन ते काम सोडून देतील, अशा दुष्ट विचाराने काही धर्मांध शक्तींनी २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळी सातच्या दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर धर्माच्या नावाने डोके भडकवलेल्या तरुणांच्या हातून गोळ्या झाडून डॉ. दाभोलकरांचा निर्घृण खून घडवून आणला. खरे तर खून झाला ती वेळ सकाळी सातच्या दरम्यानची असल्याचे नमूद आहे. म्हणजे तेथे बर्‍यापैकी उजेड होता. व्यायाम करणारी मंडळी तसेच काही कामानिमित्त बाहेर पडणारी मंडळी रस्त्यावरून जात-येत असणार. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टरांचा खून झाला, त्या ठिकाणापासून शंभर-सव्वाशे फुटावर पोलिस चौकी आहे. म्हणजे डॉक्टरांचा खून काही कुठल्या घरात किंवा गल्लीबोळात झाला नव्हता. तरीही तपास यंत्रणेला पुरेसे साक्षी पुरावे सापडले नाहीत. पोलिस यंत्रणा पोहोचली तेव्हा ओळख पटवण्यात वेळ गेला. वेळ सकाळची असल्याने संबंधित पोलिसांना तपासाचे पुढील आदेश मिळण्यास विलंब झाला. यात तास, दोन तास सहज निघून गेले. एवढ्या वेळात मारेकरी पळून जाण्यात यशस्वी झाले असणार.
वस्तुत: वेळीच सर्व तपास यंत्रणा खडबडून जागी झाली असती, तातडीने शहराची नाकेबंदी झाली असती तर मारेकरी आणि लगोलग त्यांच्या सूत्रधारांना पोलीस जेरबंद करू शकले असते; पण तसे घडले नाही. त्यानंतरही गतीने आणि तातडीने सखोल तपास व्हायला हवा होता; तो झाला नाही. खरे तर कार्यकर्त्यांनी ही बाब तेव्हाच पोलिसांच्या लक्षात आणून दिली होती. आग्रह धरला होता. अगदी सुरुवातीपासूनच मारेकरी आणि कटाचे सूत्रधार शोधण्यात तपास यंत्रणेचा ढिसाळपणा आणि हलगर्जीपणा दिसून आला होता. सातत्याने दैववादीपणाचा विरोध करणार्‍यांचे मारेकरी शोधण्यासाठी प्लांचेटसारख्या अवैज्ञानिक, दैववादी आणि भंपक बाबींचा उपयोगही पोलिसांनी केल्याचे नंतर उघड झाले. ही अतिशय संतापजनक बाब होती. अशा प्रकारे तपास यंत्रणेने ढिसाळ आणि बेजबाबदारपणे तपास प्रक्रिया राबवली. त्यामुळेच सर्वच बाबींना प्रचंड विलंब झाला. सबळ पुरावे शोधण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. परिणामी, पावणे अकरा वर्षानंतर डॉ. दाभोलकरांच्या खून खटल्यामध्ये न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोन मारेकर्‍यांना जन्मठेप सुनावली आणि बाकीचे तीन निर्दोष सुटले. पोलिस यंत्रणांनी वेळीच आणि तातडीने सखोल तपास केला असता तर पुढील तीन विचारवंतांच्या हत्या नक्कीच टळल्या असत्या. दोन मारेकर्‍यांना जन्मठेप झाली आणि तीनजण निर्दोष सुटले; मात्र सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे पुढील काळात अजूनही काही कार्यकर्त्यांच्या किंवा विचारवंतांच्या हत्या करण्यास अशा धर्मांध शक्ती मागेपुढे पाहणार नाहीत.
धर्मनिरपेक्षता आणि धर्मचिकित्सा यांचा अंनिसने कायमच आग्रह धरत पाठपुरावा केला आहे. धर्माच्या नावाखाली कार्यरत असणार्‍या धर्मांध शक्तींसाठी ही मोठीच अडचण ठरत आली आहे. या धर्मांध शक्तीचा वावर वाढत गेला, तसतसे समाजात विविध धर्मांच्या अनेक निरर्थक कर्मकांडांची संख्याही वाढत राहिली. त्यातून समाजाचे आणखी मोठ्या प्रमाणात शोषण होऊ लागले. धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाने चालणार्‍या या कर्मकांडांची अंनिसच्या वतीने शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्यावर डॉ. दाभोलकर यांनी जास्त भर दिला आणि याच धर्मचिकित्सेच्या मांडणीने दाभोलकरांचा घात झाला, असा आजही अंनिसच्या कार्यकर्त्यांचा खात्रीशीर कयास आहे. खरे तर, आजही धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी, अंधश्रद्धा यांची चिकित्सा करण्याचा आग्रह धरला जातो, त्या वेळी ही चिकित्सा म्हणजे त्या धर्मावर हल्लाच आहे, असे मानले जाते. काही धर्मद्वेष्टी मंडळी स्वतःच्या हीन स्वार्थासाठी हे विष समाजात जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्न करतात. हे नेहमीच घडत आले आहे. धर्मचिकित्सा हा धर्म सुधारणेचाच मार्ग आहे. महाराष्ट्रामध्ये लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले यांनी हे दाखवून दिले आहे. सत्य बोलणे, दया करणे, विद्या संपादन करण्याचा अधिकार सर्वांना असणे या बाबी धर्माच्या नीतीशी संबंधित आहेत. यालाच परमधर्म म्हणतात, असे लोकहितवादींनी सांगितले आहे; पण पैसा दिला म्हणजे पाप जाते, प्रायश्चित्त होते असे धर्माच्या नावाने सांगितले जाऊ लागले.
लोकहितवादी म्हणतात की लोकांनी ओळखले पाहिजे की भूतदया, अहिंसा, मन शुद्ध ठेवणे हाच श्रेष्ठ धर्म आहे. निरर्थक कर्मकांडं आणि ज्ञानशून्य आणि ढोंगी आचाराला सोडचिठ्ठी देऊन व्यक्तिप्रतिष्ठा आणि विद्यावृद्धी यांना प्राधान्य देणारा मानवहितकारक धर्म प्रस्थापित व्हावा. असे झाले, तर आपोआप अंधश्रद्धा गळून पडतील. अशाच प्रकारे धर्मचिकित्सेद्वारे धर्मसुधारणा होऊ शकते, असा कृतिशील धाडसी विचार महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारकांनी धाडसाने पुढे येऊन मांडला आहे. महाराष्ट्र अंनिसने धर्म सुधारणेबाबतचा संत आणि समाजसुधारकांचा हाच विचार समाजात रूजवण्यासाठी समाजाला सातत्याने कृतिशील कार्यक्रम, उपक्रम दिले. सत्यशोधकी बचत विवाह घडवून आणणे, जत्रायात्रांतील नवसपूर्ती म्हणून दिली जाणारी पशुबळीसारखी अनिष्ट, अघोरी प्रथा थांबवण्यासाठी सातत्याने प्रबोधन-सत्याग्रह-संघर्ष करणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या आणि विषारी रासायनिक रंगाने रंगवलेल्या विविध मूर्ती वापराच्या किंवा पिण्याच्या पाण्यात विसर्जित न करता भाविकांच्या श्रद्धांचा आदर करून, योग्य ठिकाणी विसर्जन करण्याचा आग्रह धरणे, अनेक धर्मांच्या अनेक सण, उत्सव, समारंभात, मिरवणुकीत फटाक्याची प्रचंड प्रमाणात आतषबाजी केली जाते. त्यामुळे फायद्याची एकही गोष्ट घडत नाहीच; परंतु ध्वनी, वायूचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. अपघात घडतात आणि अनाठायी मोठा खर्च होतो. अशा अनेक बाबींसाठी महाराष्ट्र अंनिसने कालसुसंगत विधायक पर्याय सुचवले आहेत आणि ते प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणले आहेत. शासनाने आणि समाजानेही अंनिसचे अनेक उपक्रम स्वीकारले आहेत.
अनेक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने अंनिसमध्ये सहभागी झाले आहेत. अनेक वेळा अनेक कार्यकर्ते स्वतःचा वेळ, श्रम, पैसा खर्च करतात. कोणत्याही शासकीय, देशी-परदेशी फंडिंगशिवाय हे काम चालू आहे. देश-परदेशातील संत, समाजसुधारक, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचा विवेकी आणि कृतीशील विचारांचा वारसा सोबत घेऊन आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत काम करण्याची पद्धत अवलंबून महाराष्ट्र अंनिस संघटितपणे आणि सनदशीर मार्गाने काम करत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या दोन मारेकर्‍यांना जन्मठेप झालीच आहे; परंतु निर्दोष सुटले आहेत आणि सूत्रधार अजून मोकाट आहेत. त्या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणून दोषी ठरवण्यासाठी यापुढेही संघटना प्रयत्न करत राहील.
(लेखक महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव आहेत.)
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *