महाराष्ट्रात पशुविज्ञान दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठ हे नागपुरात आहे. यातील मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे केंद्र हे नागपूरहून रत्नागिरी येथे कोकणात स्थलांतरित करावे अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय नियोजन नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी केली असल्याचे वृत्त आहे. ही मागणी करताना जिथे पाणी नाही तिथे मत्स्य व्यवसायाचा अभ्यास कसा करणार असा प्रश्नही डॉक्टर मुणगेकरांनी उपस्थित केल्याचे वृत्त आहे.
डॉ.मुंणगेकरांनी ही मागणी करताना ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष असताना २०११ साली केंद्र शासनाला सादर करण्यात आलेल्या एका अहवालाचा दाखला दिला आहे. या संदर्भात. आजच्या दैनिक बित्तमबातमीमध्ये आलेले निवेदन वाचले तर डॉक्टर मुंणगेकरांनी मत्स्य व्यवसाय अभ्यासताना फक्त समुद्री मत्स्य व्यवसायाचाच विचार केला आहे असे दिसून येते.वस्तूतः मत्स्य व्यवसायात समुद्रात उपलब्ध होणारे खारे मासे आणि उर्वरित नदी आणि तलावांमध्ये उपलब्ध होणारे गोडे मासे असे दोन प्रकार ढोबळमानाने करता येतात. महाराष्ट्रात समुद्री किनारा फक्त ७२० किलोमीटर आहे. या समुद्री किनाऱ्या लगतचा जवळजवळ साडेतीन लाख हेक्टर परिसर सोडल्यास उर्वरित महाराष्ट्रात जिथे कुठे मत्स्य व्यवसाय होतो तो गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय होत असतो. आज कोकणात समुद्रातील माशांचा मोठा व्यवसाय सुरू आहे. मात्र त्याचवेळी इकडे दुसऱ्या टोकाला चंद्रपूर, गडचिरोली भंडारा, गोंदिया या क्षेत्रातही तिथल्या नद्या आणि तलावांमध्ये होत असलेला मत्स्य व्यवसाय हा डॉ. मुंणगेकरांनी हिशेबात धरलेला दिसत नाही. जाणकारांच्या माहितीनुसार आज कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ठीक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात हा गोड्या पाण्यातील माशांचा मत्स्य व्यवसाय सुरू आहे. चंद्रपूर गडचिरोली परिसरातील गोड्या पाण्यातील झिंगे नामक मासे आजही पट्टीच्या खवय्यांची गरज आहेत.मात्र इथे आवश्यकता आहे ती या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची. जर इथे गांभीर्याने लक्ष दिले तर उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अतिरिक्त उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो, आणि त्यायोगे आज ज्या शेतकरी आत्महत्यांमुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे, त्या शेतकरी आत्महत्या देखील कमी केल्या जाऊ शकतात.
आज कोकणात ७२० किलोमीटर समुद्रकिनारा आहे. त्याला लागून अतिविशाल असा अरबी समुद्र आहे. त्यामुळे तिथे मत्स्य व्यवसाय होतो यात वावगे काहीच नाही. मात्र उर्वरित महाराष्ट्रात ठीकठिकाणी मोठमोठ्या नद्या आहेत, त्यात विदर्भात वैनगंगा, पैनगंगा, आहेत तर खानदेशात गोदावरी आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा कोयना ही आहेत. याशिवाय या प्रत्येक क्षेत्रात अनेक लहान-मोठे तलाव आहेत. ठिकठिकाणी असलेल्या नद्यांवर बंधारे बांधले गेले आहेत, आणि त्यायोगे तिथे जलाशय निर्माण झाले आहेत. या सर्व ठिकाणी माशांचे उत्पादन कमी जास्त प्रमाणात होतेच. शास्त्रशुद्ध पद्धतीने हे उत्पादन वाढवता कसे येईल आणि त्यातून शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल या दृष्टीने विचार व्हायला हवा. हा विचार करण्यासाठीच मत्स्य व्यवसाय विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
आज पशुवैद्यक दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठ हे नागपूरात आहे. मुंडेकरांच्या मते नागपुरात पाणी नाही. त्यामुळे या विद्यापीठाचे मत्स्य व्यवसाय केंद्र वेगळे करून ते कोकणात स्थलांतरित करायला हवे. या संदर्भात माहिती घेतली असता महाराष्ट्रात मत्स्य व्यवसाय विषयाला वाहिलेले एकच महाविद्यालय असून ते रत्नागिरी येथे आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या मंडळींना नागपुरात असलेल्या पशुवैद्यक आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचा हस्तक्षेप नको आहे. नागपुरातील पशुवैद्यक विद्यापीठ सुरू होण्यापूर्वी रत्नागिरीचे हे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापीठा अंतर्गत कार्यरत होते. ते तसेच राहावे म्हणजे रत्नागिरीच्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या मंडळींना रत्नागिरीतच राहता येईल. त्यांच्या नागपूरला बदल्या होणार नाहीत यासाठी हे केंद्र रत्नागिरीलाच स्थलांतरित व्हावे असा आग्रह केला जातो आहे. त्यामुळेच मग नागपुरात पाणी नाही तरी मत्स्य व्यवसाय विद्यापीठ कसे असा प्रश्न मुणगेकरांकडून उपस्थित केला जातो आहे.
मात्र इथे मुणगेकर एक मुद्दा विसरतात. रत्नागिरी मध्ये एक मत्स्य व्यवसाय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातून त्या परिसरातील समुद्री माशांचा मत्स्य व्यवसाय कसा वाढवता येईल आणि त्यायोगे कोकणातील माणूस अधिक सक्षम कसा करता येईल हा विचार होऊ शकतो. त्यासाठी तिथे विविध संशोधने केली जाऊ शकतात. मात्र त्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय कसा वाढवायचा हा विचार कितपत सक्षमतेने केला जाऊ शकेल याचेही उत्तर मुंणगेकरांनी द्यायला हवे. आज महाराष्ट्राची मत्स्यबीजांची जी गरज आहे ती सद्यस्थितीत भागवली जात नाही अशी माहिती आहे. अशावेळी या सर्वच स्त्रोतांचा उपयोग करून गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढवता येऊ शकतो, आणि महाराष्ट्राची गरज भागवून इतर भागात देखील मत्स्यबीज आणि मासळी पुरवली जाऊ शकते. आज वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात ठीक ठिकाणी मोठमोठ्या नद्या आहेत. अनेक जलाशय देखील आहेत. नव्या धोरणानुसार ज्यांच्याकडे पाच एकरहून अधिक शेतजमीन आहे तिथे शेततळी देखील तयार केली जात आहेत. या शेततळ्यांमध्ये देखील मत्स्य व्यवसाय केला जाऊ शकतो. विदर्भातील भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ साडेआठ हजार माजी मालगुजारी तलाव आहेत. त्यातील अनेक तलाव अतिक्रमणामुळे बुजवले गेले आहेत. अनेक तलाव कोरडे पडलेले आहेत. हे सर्व तलाव जर त्यातील गाळ काढून स्वच्छ केले अतिक्रमणही हटवले तर या ठिकाणी गोड्या माशांचा मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतो. अशावेळी नागपुरात इतकेच काय तर छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे देखील मत्स्य व्यवसायासाठी अभ्यास केंद्र सुरू करून त्यायोगे नवे नवे प्रयोग करून हा व्यवसाय कसा वाढवता येईल आणि आज आत्महत्ये कडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची नवी दिशा कशी दाखवता येईल याचाही विचार होऊ शकतो. गोड्या पाण्यातला मत्स्य व्यवसाय वाढवायचा तर फक्त अभ्यास केंद्रेच हवीत असे नाही, तर त्यासाठी काही कायदे देखील करावे लागतील असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्राचे एक सुविद्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये फिशरीज कॉरिडॉर तयार करण्याची संकल्पना मांडली होती त्या दृष्टीने शासन स्तरावर हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. या हालचालींना गती येऊन ही संकल्पना प्रत्यक्षात कशी येईल आणि त्या दृष्टीने त्यायोगे महाराष्ट्रात फक्त ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा मत्स्यव्यवसाय कसा वाढवता येईल आणि त्यायोगे शेतकरी संपन्न कसा करता येईल या दृष्टीने विचार व्हायला हवा. डॉ. मु मुंणगेकर हे एक सुविद्य अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले आहेत. त्यांनी कायम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल असाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी आता फक्त कोकणचा विचार न करता समग्र महाराष्ट्राचा विचार करावा, कोकणासोबत उर्वरित महाराष्ट्रालाही महाराष्ट्रातही पाणी आहे हे लक्षात घेऊन त्यांनी नियोजन करण्यात पुढाकार घ्यावा इतकेच इथे सुचवावेसे वाटते.