विशेष
योगेश त्रिवेदी
१९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण आंदोलन झाले. अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून इंदिरा गांधी ओळखण्यात येत होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इंदिरा गांधी वैफल्यग्रस्त झाल्या आणि पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्या ऐवजी त्यांनी आणिबाणी लादली. सर्व विरोधकांना तुरुंगात डांबले. इतकेच नव्हे तर तरुण तुर्क म्हणून ओळखण्यात येणारे चंद्रशेखर, कृष्णकांत, मोहन धारिया यांचा सल्लाही धुडकावत त्यांनाही कारावासात टाकले. १९७७ साली गुप्तचर विभागाच्या चाचपणीनंतर इंदिरा गांधी यांनी आणिबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल आणि संघटना कॉंग्रेस या चार पक्षांची जनता पार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भारतीय लोकदलाच्या नांगरधारी शेतकरी या चिन्हावर विरोधकांनी निवडणूक लढविली. इंदिरा गांधी यांच्या विरोधातील असंतोष मतपेटीतून दिसून आला. भारताच्या राजकीय इतिहासात जनता पार्टी आधी सत्तेवर आली आणि मग पक्षाची विधिवत स्थापना झाली. मार्च १९७७ मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मे १९७७ मध्ये पक्ष स्थापन झाला. त्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती अब नारा हैं, भावी इतिहास हमारा हैं | जनता आयी है, सिंहासन खाली करो || अशा बुलंद घोषणांनी सारा देश दुमदुमला होता. भारतातील सुजाण, सूज्ञ नागरिकांनी इतिहास घडविला होता आणि इंदिरा गांधी यांची दमनकारी राजवट उलथवून टाकली होती. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. रायबरेली मतदारसंघात विदुषक म्हणून हिणविण्यात येणाऱ्या राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांना पराभवाची धूळ चारली होती. जनता पार्टी या पक्षाचा महिमा लक्षात घेऊन पुढे भारतीय राजकारणात जनता पार्टी हे नांव आपापल्या पक्षांच्या नावांत कायम ठेवून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुण्याईचा लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी जनता दल बनविला. भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी जनता पार्टी मधून वेगळे होत भारतीय जनता पार्टी स्थापन केली. बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, समाजवादी पार्टी असे अनेक पक्ष विखुरले. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जनता पार्टीचे अस्तित्व २०१४ पर्यंत कायम ठेवले आणि नंतर भारतीय जनता पार्टी मध्ये हा पक्ष विलीन केला. २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली परंतु पाशवी बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. २०१४ साली इतर पक्षांतील नेत्याना भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश देत गेले, पक्षाची सूज वाढत गेली. २०१९ मध्ये ही परंपरा कायम ठेवतांना जुन्या मित्रांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करीत मित्रांना दिलेल्या शब्दांचा बेमालूम उलटा अर्थ लावीत विश्वासघाताची पावले पडू लागली. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणवणारे नेते सोफिटेल, मातोश्री आणि ब्ल्यू सी मध्ये आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत बंद दाराआड चर्चा करुन उद्धव ठाकरे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. बंद दाराआड झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांना सामील करुन घेण्यात आले नव्हते. या निष्ठावंत नेत्याने अपमान गिळून ब्ल्यू सी मध्ये सारे काही उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार झाल्याची उद्घोषणा केली. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्ष ३०३ वर पोहोचताच ज्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००२ मध्ये गुजरात मध्ये मुख्यमंत्री पदावर अभयदान दिले होते आणि ज्यांच्या मैत्रीच्या जोरावर गगनाला गवसणी घातली होती त्याच भारतीय जनता पार्टीने आपले रंग उधळायला सुरुवात केली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ऐवजी ‘अपनाही विकास, मित्रोंका विश्वासघात’ ही घोषणा रुढ करीत पन्नास पन्नास टक्के सत्तेत वाटा हे ठरलेच नव्हते अशी जबरदस्त थाप ठोकीत शिवसेनेला दूर ढकलले. २३ नोव्हेंबर २०१९ च्या सक्काळी अजितदादा पवार यांना सोबत घेऊन ऐंशी तासांचे सरकार बनविण्याचा विक्रम केला. ज्यांच्या ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या सर्वांना आपल्या धुलाई यंत्रातून शुद्ध करुन घेण्याचे पौरोहित्य अपमान गिळणाऱ्या निष्ठावंत नेत्याने केले. महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदानंतर मंत्री बनण्याची सुरु केलेली प्रथा शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये सहभागी होत पुढे रेटली. देशपातळीवर १४० कोटी नागरिकांच्या ‘जन की बात’ ऐवजी ‘मन की बात’ सुरु झाली आणि इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकाधिकारशाहीची वाटचाल पहायला मिळू लागली. अनेक छोटे छोटे मित्रपक्ष गिळून, तोडून मोडून आपला विस्तार, आपलाच विकास सुरु झाला. जनता त्राहिमाम त्राहिमाम चा आकांत करु लागली. भावनेच्या घोड्यावर स्वार होऊन अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गोष्टींकडे कानाडोळा करण्यात येऊ लागला. या चौखूर उधळलेल्या मदमस्त घोड्याला लगाम घालण्यासाठी आणि त्याला त्याची ‘पागा’ (जागा) दाखविण्यासाठी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत बुजुर्ग नेते शरद पवार, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, सिताराम येचुरी, ममता बॅनर्जी अशी सर्व विरोधी पक्षांची नेतेमंडळी इंडिया आघाडीच्या एकाच छताखाली एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एकाधिकारशाहीला आव्हान दिले आहे. ज्या ज्या मित्रांनी भारतीय जनता पार्टीला वाढविण्यासाठी सहकार्य केले किंबहुना ज्यांनी ‘अभयदान’ दिले त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवण्याऐवजी, कृतघ्नपणाचा कळस गाठून उपकाराची परतफेड अपकाराने करण्याचा विडा उचलण्यात आला. कोरोनाच्या महामारीत देशातील अव्वल मुख्यमंत्री म्हणून पहिल्या पाचात येण्याचा मान सतत चार वेळा मिळविणाऱ्या उद्धव ठाकरे यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचणाऱ्यांचा मनसुबा उधळून लावण्यासाठी सुजाण, सूज्ञ जनता ‘इंडिया’ आघाडीच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी असून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती प्रमाणेच जनता आयी है सिंहासन खाली करो या धर्तीवर ‘इंडिया’ आयी है सिंहासन खाली करो’ असा इशारा/नारा देत मनमानी, एकाधिकारशाहीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. या योगे लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान मजबूत आणि अबाधित ठेवण्यासाठी संकल्प केला आहे. ४ जून २०२४ रोजी सात टप्प्यातील लोकसभेच्या मतदानाचा निकाल लागणार असून तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे रामशास्त्री बाण्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कडेही देशातील लोकशाही प्रेमी आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असणाऱ्यांचे डोळे लागले आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निकाल देऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीची बूज राखतील असा विश्वास वाटतो. याचवेळी एक बाब निदर्शनास आणू इच्छितो की सध्या देशात जे वातावरण निर्माण झाले आहे त्याचे विदारक वर्णन करणारी घटनेची माहिती देणारा मंत्रालयातील माजी अधिकारी सुभाष सूर्यवंशी यांनी समाज माध्यमावर पाठविलेला संदेश येथे मुद्दाम उद्धृत करु इच्छितो. सुभाष सूर्यवंशी म्हणतात, “योगेश नमस्कार, मुंबईत अघोषित आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली कि काय? असा प्रश्न पडतो आहे. कारण आज सकाळीच ८.३० च्या दरम्यान मी सकाळचा वाॅक करून पोयसर जिमखान्यातून चारकोपला घरी परतत असताना एक पोलीस अधिकारी, फोटोग्राफर व आणखी दोन खाजगी वेशातील अधिकारी वाटणार्या दोन व्यक्तींनी माझी चारचाकी गाडी आडवली व गाडीची डिकी ओपन करुन गाडीचे मागून पुढून फोटो काढून चेक केली. हे कसले चेकिंग विचारले असता हे इलेक्शन चेकिंग आहे असे सांगितले. गाडीचे फोटोज का काढले हे विचारले असता हेही इलेक्शनसाठीच असेही सांगण्यात आले. यामुळेच मी आपल्याकडे चौकशी करत आहे. आपला मित्र, -सुभाष सूर्यवंशी” श्री. सुभाष सूर्यवंशी यांनी देशातील नावाजलेले मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांचा कित्ता गिरविणारे राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ जात असल्याची चर्चा आहे. या दरम्यान त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे म्हणतात, “१९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ ला दुसरे स्वातंत्र्य मिळाले आता तिसरे स्वातंत्र्य मिळवायचे असून मोदीमुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. २०१३ मध्ये ज्यांनी मोदींना पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांनीच मोदीमुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यांचाही मान ‘इंडिया’ आघाडी निश्चित राखील हे निःसंशय ! लोकशाही अबाधित राहो !