विशेष
रमेश कृष्णराव लांजेवार
पुण्यातील पोर्शे अपघाताची चर्चा सुरूच असतानाच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ दिनांक २४ मे २०२४ शुक्रवारला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने तिघांना धडक देवुन जखमी केले.यात महिलेसह तीन महिन्यांचा चिमुकला व एक इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.ही माहिती पोलिस प्रशासनाला कळताच घटनास्थळी तातडीने धाव घेतली व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले व पोलीस प्रशासनाने आपली भूमिका चोख बजावली.याशिवाय कारचालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हा हा गुन्हाच असतो त्यामुळे कारचालकां वरील कारवाई पुण्यातील पोर्शे अपघाता प्रमाणेच कायद्याच्या चौकटीतून केली जाईल असे मला वाटते. त्याचप्रमाणे हिट अँड रन केसची ह्रदयदायक घटना दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वे स्थानकाजवळच्या राम झुल्यावर घडली होती.३९ वर्षीय धनाढ्य महिला रितिका मालू मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मर्सिडीज कार चालवीत होती.तिची कार अनियंत्रित होवून मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया हे दोन तरूण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली व गंभीर जखमी झाले.अशा परिस्थितीत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले.या केसमध्ये सत्र न्यायालयाने १३ मार्च रोजी प्रार्थमिक सुनावणी नंतर रितिका मालूला विविध अटीसह तात्पुरता जामीन दिला होता.परंतु पुणे पोर्शे अपघातानंतर याला वेगळेच वळण आले व रितिका मालूच्या अडचणी वाढल्याचे दिसून येते. २२ मे २०२४ रोजी अंतिम सुनावणीमध्ये सरकारी वकील यांनी रितिका मालूला कायमचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास जोरदार विरोध केला.यामध्ये दोन्ही पक्षांची सत्र न्यायालयापुढे आपली बाजू मांडली व निर्णय राखीव ठेवण्यात आला होता.कारण देशभर गाजत असलेल्या पुणेतील पोर्शे कारसारखा भीषण अपघात करणारी नागपूरची ३९ वर्षीय धनाढ्य महिला रितिका मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून दिनांक २४ मे २०२४ शुक्रवारला फेटाळून लावला.न्यायाधीश आर.एस.पाटील (भोसले) यांनी हा निर्णय दिला.त्यामुळे आता गुन्हेगारांना माफी नाही हे न्यायालयाने सिध्द केले.आता स्थानिक प्रशासनाला गुन्हेगारांच्या बाबतीत मुसक्या आवळण्यात न्यायालयाकडून अवश्य सहकार्य मिळेल हे स्पष्ट दिसत आहे.यावरून स्पष्ट होत आहे की सरकार व प्रशासन ॲक्शन मोडमध्ये असुन अलर्ट आहे.त्याचा फायदा न्याय रूपात सर्वांना अवश्य होईल.यापुढे हिट अँड रन च्या बाबतीत कठोर कारवाईचे प्रावधान असावे.कारण सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून, पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून व कायद्याच्या चौकटीतून श्रीमंतांना सुध्दा सर्वसामान्यांना सारखी सजा होणे अपेक्षित आहे. पुणे पोर्शे अपघात किंवा नागपूरचा रामझुल्यावरील अपघात किंवा नागपूरातील झेंडा चौक येथील मद्यधुंद कारचालकांनी उडविण्याचे प्रकरण हा अत्यंत गंभीर व संवेदनशील गुन्हा आहे. सरकारने हेही लक्षात ठेवले पाहिजे की फक्त पुणे पोर्शे अपघाताला बाऊ न करता राज्यासह देशातील संपूर्ण हिट अँड रन अपघातांवर अंकुश लावण्यासाठी युध्दपातळीवर कारवाई करायला हवी.मद्यधुंद असणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी.अपघात हा अपघातच असतो आणि राज्यासह देशात दिवसेंदिवस हिट अँड रन अपघातांचे प्रमाण दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अपघात करणारा कारचालक हा अल्पवयीन असो अथवा सज्ञान तो गुन्हेगारच त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे.हिट अँड रन च्या बाबतीत आता फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून ताबडतोब कारवाई व्हावी.यामुळे मृतांच्या व जखमींच्या परिवाराला योग्य न्याय मिळण्यास मदत होईल.