राजकारणात प्रतिपक्षाची उणीदुणी शोधणे आणि त्यांना नामोहरम करणे ही नेहमी चालतेच, नव्हे राजकारण करायचे तर ते क्रमप्राप्तच असते. अशी उणीदुणी शोधून प्रतिपक्षात भांडणे लावून देणे हे देखील एक महत्त्वाचे काम असते. कारण शत्रूमध्ये फूट पडली तर आपला विजय सोपा होतो, असे म्हणतात. आपल्या देशावर दीडशे वर्ष इंग्रजांनी आणि त्यापूर्वी जवळ जवळ हजार वर्ष मोगलांनी राज्य केले ते याच पद्धतीने. हिंदूंमध्ये फूट पाडायची आणि आपण त्यांच्यावर राज्य करायचे हीच मोगल आणि इंग्रजांची पद्धत होती आणि त्यात ते यशस्वी देखील झाले.
अशीच काहीशी परिस्थिती सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची झालेली दिसते आहे. जेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे फाटले तेव्हापासून भाजप नेत्यांवर रोज सकाळी नऊ वाजता आरोप करणे हा त्यांचा आवडीचा उद्योग बनला आहे. नाही म्हणायला गेल्या वर्षभरापासून नऊ वाजता त्यांनी केलेल्या आरोपांवर प्रति आरोप करण्यासाठी भाजप तर्फे दुपारी बारा वाजता आमदार नितेश राणे हे देखील मैदानात उतरतात. या दोघांच्याही आरोप प्रत्यारोपानी महाराष्ट्राचे चांगलेच मनोरंजन होते हा भाग वेगळा.
खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाचे कार्यकारी संपादक आहेत. या दैनिक सामना मधूनही ते दररोज काही ना काही आरोप करत असतात. काही वेळा त्या आरोपांमध्ये काहीसे तथ्य असते. तर काही वेळा त्यांनी केलेले आरोप निरर्थक असतात.
रविवारी दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी धमाकेदार भाष्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनीही एकत्र येऊन काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना रसद पुरवली होती. त्यापुढे जाऊन राऊत यांचे असेही म्हणणे आहे की आपण रसद न पुरवताही गडकरी निवडून येणार हे स्पष्ट दिसू लागले, तेव्हाच फडणवीस गडकरींच्या प्रचारात उतरले. अन्यथा तोवर गडकरींच्या प्रचारासाठी फडणवीस नागपुरात फिरकलेही नव्हते.
संजय राऊत यांच्या या रोखठोक मधल्या दाव्यांमुळे महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या त्यांच्या दाव्यामुळे भाजपचे प्रवक्ते आणि नेते हे तर संतप्त झालेच. पण शिवसेना ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेले काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांच्या या विधानाने अस्वस्थ झालेले आहेत. ज्यांना मोदी शहा आणि फडणवीस यांनी रसद पुरवली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे ते विकास ठाकरेच चांगले संतप्त झाले होते. माध्यमांसमोर बोलताना आतापर्यंत आपण अनेक निवडणुका लढवल्या असून आपल्याला कोणत्याही रसदीची गरज नाही, आपण स्वबळावर लढत देऊ शकतो, असे त्यांनी ठणकावले आहे.
वस्तूतः नरेंद्र मोदी २०१३ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. त्यापूर्वी काही महिने आधी म्हणजेच २०१३ च्या फेब्रुवारी महिन्यात गडकरींना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागले होते. जेव्हापासून मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार बनले तेव्हापासून गडकरी आणि मोदी यांचे पटत नाही आणि दोघेही एकमेकांना पाण्यात पाहतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यामागे कारणही तसेच होते. २०१३ पूर्वी राजकीय विश्लेषक गडकरींनाच पंतप्रधान पदाचे पुढचे दावेदार मानत होते. भाजपमध्ये पंतप्रधानपदासाठी आणखी एक दावेदार आला म्हणून मोदी आणि त्यांचे पटत नाही असा दावा केला जात होता. तरीही २०१४, २०१९आणि आता २०२४ मध्ये गडकरींना उमेदवारी मिळाली आहे. २०२४ आणि २०१९ मध्येही गडकरी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आणि दोन्ही वेळा त्यांना नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात जबाबदारीचे स्थान दिलेले भारताने पाहिले आहे. नितीन गडकरी यांनीही त्यांना मिळालेल्या संधीचे कायम सोनेच केले आहे. तरीही गडकरी आणि मोदी यांचे पटत नाही आणि गडकरींना पाडण्यासाठी मोदींचे प्रयत्न असतात अशी कुजबुज प्रत्येक निवडणुकीत काही हितसंबंधी गटांकडून केली जाते. मोदी शहा गडकरी आणि फडणवीस यांच्यात काही कटूता असेलही, तरी आपल्याच पक्षाचा एक खंदा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करण्याइतके हे तिघेही नेते अपरिपक्व म्हणता येणार नाहीत. असे म्हणण्यामागे कारणही बरीच आहेत. सर्वात प्रमुख कारण म्हणजे १९७७ पूर्वी ज्याप्रमाणे या देशात कोणी कितीही विरोध केला तरी काँग्रेसला सहजगत्या स्पष्ट बहुमत मिळूनच जायचे, तशी परिस्थिती आज देशात भारतीय जनता पक्षाची नाही. आजही त्यांना सत्ता मिळवण्यासाठी रणनीती आखून निवडणूक लढवावी लागते, आणि त्यावेळी त्यांना एकेक खासदार महत्त्वाचा असतो. वाजपेयींच्या काळात एका मताने सरकार पडण्याचा अनुभव भाजपने घेतलेला आहे. त्यामुळे निवडणुकीत उभा राहणारा खासदार पाडण्याचे काम आज तरी भाजपतील कोणीही नेता करणार नाही हे नक्की. त्यातही गडकरी हे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एक स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे फक्त स्वच्छ प्रतिमेचाच नाही तर धडाकेबाज निर्णय घेऊन धडाक्यात कामे करणारा मंत्री म्हणूनही ते ख्यातनाम आहेत. त्यामुळे जनमत त्यांच्या पाठीशी आहे. आज नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी उभे राहणार म्हटल्यावर त्यांना पर्याय कोण द्यायचा हा विरोधकांना प्रश्न पडतो. त्यामुळे निवडून येण्याची गॅरंटी असलेला हा उमेदवार आहे.
इथे आणखी एक मुद्दा विचारात घ्यावा लागेल. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आहेत. संघाची वरिष्ठ मंडळी, त्यात डॉ. भागवतांपासून तर अगदी प्रांत प्रचारकांपर्यंत सर्वांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्या उमेदवारीला संघ वर्तुळातूनही कायम समर्थन मिळत राहिलेले आहे. अशावेळी गडकरींना पाडण्यासाठी भाजपची भाजपातीलच काही मंडळी सक्रिय झाली तर संघ वर्तुळात ते कळल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे पडसाद भविष्यात उमटू शकतात. आज जरी जे पी नड्डा म्हणत असले की आता आम्हाला संघाची गरज नाही, तरी जर पुढच्या निवडणुकीत संघाने मूक असहकार पुकारला तर भाजपला जड जाऊ शकते, याची या सर्वांनाच कल्पना आहे.
हे मुद्दे लक्षात घेतले तर मोदी शहा आणि फडणवीस हे गडकरींना पाडण्यासाठी विकास ठाकरेंना रसद पुरवत होते या जावईशोधावर कोणीही शहाणा माणूस विश्वास ठेवणार नाही.राऊत यांनी यापूर्वीही असे उद्योग केले होते. मार्च महिन्यात ज्यावेळी भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावेळी त्यात गडकरींचे नाव नव्हते. अर्थात त्यामागे कारणेही वेगळी होती. ती कारणे नंतर फडणवीसांनी स्पष्टही केली होती. मात्र ती यादी जाहीर होताच गडकरींना भाजपाने उमेदवारी नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी ओरड संजय राऊत यांनी केली होती. तर भाजप उमेदवारी देत नसेल तर गडकरींनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना निवडून आणू अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनीही दिली होती. त्यावेळी देखील विकास ठाकरे चांगलेच संतप्त झाले होते. आम्ही गडकरींच्या विरोधात प्रचार करतो आणि ठाकरे आणि राऊत त्यांचे गोडवे गातात, हे कसले आमचे मित्र पक्ष? असा सवालही विकास ठाकरेंनी केला होता. हे सर्व प्रकार बघता संजय राऊत हे असे नसते उद्योग नव्हे उपद्व्याप का करतात असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो. भाजपची उणीदुणी शोधणे, त्यांच्यात भांडणे लावणेआणि त्यांना नामोहरम करणे, हे करताना कुठेतरी सत्याचा आधार घ्यावा इतकेच त्यांना सुचवावेसे वाटते. त्यांनी असे केले नाही तर त्यांचे हे नसते उपद्व्याप भविष्यात महाराष्ट्र नसत्या उचापती म्हणून दुर्लक्ष करू लागेल हा धोकाही त्यांनी लक्षात घ्यायला हवा.