मुंबई : लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्याचे मतदान आज दिनांक 1 जूनला होत असून सायंकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपताच देशभरातली विविध संस्था आणि वृत्तवाहीनीने केलेले एक्झिट पोलचे गुपित उद्या उघड केले जाईल. मतमोजणी चार जूनला असली तरी सत्तेचे गुपित या एक्झिट पोलमधून कळत असल्याने सगळ्यांच्याच नजरा यावर एक्झिट पोलवर खिळल्या आहेत.

दरम्यान काँग्रेस पक्षाने या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्झिट पोलच्या माध्यमातून बेटिंग मार्केटवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे पक्ष 4 जूनला निकालाची वाट पाहणार आहे.

काँग्रेसने यावेळी विरोधी इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल आणि 2004 मध्ये जे घडले त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होईल, असा दावा केला आहे. 2004 मध्ये भाजपने इंडिया शायनिंगचा नारा दिला होता आणि पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा दावा केला जात होता, पण उलटा निकाल आला होता. केंद्रात यूपीएचे सरकार स्थापन झाले होते. तोच पुन्हा चमत्कार होईल,  असा काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि त्यानंतर अवघ्या 48 तासांत पंतप्रधानांची निवड केली जाईल. ज्याला जास्त जागा मिळतील त्यांचा पंतप्रधानपदासाठीही अधिक दावा असेल. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विश्वास व्यक्त केला की इंडिया आघाडीला 272 च्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळतील.

निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांसारख्या एनडीए सहयोगींसाठी दरवाजे खुले असतील का? या प्रश्नावर ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर एनडीएचे सहयोगी देखील युतीमध्ये सामील होऊ शकतात. तथापि, त्यांचा समावेश करायचा की नाही हे काँग्रेस हायकमांड ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *