देशी वृक्षसंपदा वाढीसाठी लोकसहभागातून राबविला जातोय अभिनव पर्यावरणशील उपक्रम

नवी मुंबई : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा प्रत्येकाचे अत्यंत आवडीचे फळ आहे. रसाळ आंबा खाऊन तृप्त झाल्यानंतर त्या आंब्याची कोय (Mango Seed) सर्वसाधारणपणे ओल्या कच-यात टाकून दिली जाते. मात्र ही कोय जर मातीत रूजवली तर त्यापासून पुन्हा रसाळ आंबे देणारे झाड उगवू शकते आणि पुढच्याही पिढ्यांना तृप्त करू शकते तसेच त्याच्या थंडगार पर्णछायेखाली गारवाही मिळू शकतो.

नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत *नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून 5 जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व उद्यान विभागांच्या वतीने आंब्याच्या कोयी संकलित करण्याचा एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानातही नवी मुंबई हे राज्यातील अग्रणी शहर असून यामध्ये सुजाण नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच या अभियानांना पूरक असा नवी मुंबईच्या घराघरातून आंब्याच्या कोयी संकलित करून त्यामधून वृक्षसंपन्नता वाढविणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत 5 जून रोजी नवी मुंबईतील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॅरंट्स व हॉटेल्स अशा ठिकाणांहून आंब्याच्या कोयी स्वतंत्ररित्या संकलित करून घेतल्या जाणार असून त्याच्या वृक्षरोपांतून निसर्गाचे देणे निसर्गालाच परत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या माध्यमातून ओला, सुका व घरगुती घातक अशा 3 प्रकारे वर्गीकरण होणा-या कच-यामधील आंब्याच्या कोयींचे स्वतंत्र वर्गीकरण होऊन त्याचा उपयोग पर्यावरण संवर्धनासाठीही होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान’ या दोन्ही महत्वाच्या अभियानांना सामावून घेणारा हा पूरक उपक्रम आहे.

तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आजपासून आपल्याकडील आंबे खाऊन झाल्यानंतर उरलेल्या आंब्याच्या कोयी ((Mango Seed) नेहमीच्या ओल्या कच-यात टाकून न देता त्या पाण्याने धुवून स्वच्छ कराव्यात व 5 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र संकलनाची व्यवस्था केलेल्या वाहनात द्याव्यात आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी पर्यावरण संवर्धनात आपलाही सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *