क्रिकेट स्पर्धेच्या आडून तरुणांना फोडण्याचे षडयंत्र :- प्रा. वर्षा गायकवाड
धारावीवर अधिकृत किंवा अनधिकृतचा ठपका ठेवणारे मोदानी अँड कंपनी किंवा DRPPL आहेत तरी कोण?
मुंबई : धारावीकरांच्या एकजुटीला घाबरून मोदानी अँड कंपनीने ही एकजूट तोडण्यासाठी नवा डाव आखला आहे. खोटा प्रचार, दहशत आणि पैशांचा काही उपयोग होत नसताना आणि त्यांच्या धारावी विनाश मॉडेल पात्रता सर्वेक्षणाला धारावी वासीयांकडून ठिकठिकाणी तीव्र विरोध होत असताना, तरुणांच्या भावनांशी खेळण्यासाठी मोदानी अँड कंपनीनं नवी शक्कल लढवली आहे. धारावीकरांची एकजूट तोडण्यासाठी अदानी-प्रणित DRPPL ने सेक्टर निहाय क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली आहे. हे एक षडयंत्र असून धारावीकर त्याला बळी पडणार नाहीत. दहशत, फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण इथे चालणार नाही असा खणखणीत इशारा देत मोदानी विकास मॉडेल अजिबात मान्य नाही याचा पुनरुच्चार मुंबई काँग्रेस अध्यक्ष व धारावीच्या आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
मोदानीच्या षडयंत्राचा पर्दाफाश करत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, क्रिकेट हा आपल्या देशाला एकत्र आणणारा खेळ आहे पण क्रिकेटच्या नावाखाली मोदानी अँड कंपनीने धारावीची एकजुटता मोडीत काढण्याची योजना आखली आहे ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे.
DRPPL कडून स्पर्धक संघ आणि प्रेक्षकांना मोठी रोख रकमेची बक्षिसे देण्याचे आमिष दाखवले आहे. पण त्यांचा खेळ टिकणार नाही, धारावीतील घरे आणि जमीन काबीज करण्याचा त्यांचा खरा हेतू धारावीतील प्रत्येक मुलाला माहीत आहे. सर्व धारावीकरांना माहीत आहे की, मोदानी अँड कंपनीला धारावीकरांशी काही आपुलकी नाही, त्यांचा डोळा धारावीच्या जमिनीवर आहे. आमचे हक्क मारून, लाखो धारावीकरांना विस्थापित करून त्यांना इथे बीकेसीचे विस्तारीकरण करायचे आहे. पण धारावीकरांची एकजूट हीच धारावीची ताकद आहे, याच एकजुटीने कोरोनासारख्या महामारीचा पराभव केला. याच एकजुटीने त्यांच्या कपटीपणाचा पराभव करू. संपूर्ण धारावी कुटुंब एकसंघ आहे. आमचे धारावी न्याय योद्धा धारावी लुटण्याचा हेतू पूर्ण होऊ देणार नाहीत. त्यांना पराभूत केल्याशिवाय हे न्याय योद्धा शांत बसणार नाहीत. आम्हाला धारावीचा विकास हवा आहे, धारावीकरांच्या गरजा, इच्छा आणि आकांक्षांना प्राधान्य देणारा विकास हवा आहे, अदानी सुपर मॉडेल नको.
क्रिकेट स्पर्धेच्या प्रचारासाठी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये धारावीला ‘अनौपचारिक वस्ती’ असे संबोधले आहे. ज्या धारावीला धारावीकरांनी आपल्या प्रामाणिकपणातून, मेहनतीतून आणि एकजुटीतून उभं केलं त्या कठोर परिश्रमांचा हा अपमान आहे. आमच्यावर अधिकृत किंवा अनधिकृतचा ठपका ठेवणारे मोदानी अँड कंपनी किंवा DRPPL हे आहेत तरी कोण? धारावी ही भारताचे ‘स्किल कॅपिटल’ आहे, इथल्या लोकांनी धारावीला ओळख दिली, इथले लोक या जमिनीचे मालक आहेत. क्रिकेटच्या नावाखाली चाललेला मोदानी कंपनीचा खरा डाव समजून घ्या, यांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि धारावीला वाचवण्याच्या या संघर्षात सर्वजण भक्कम साथ देतील असा विश्वास आहे.
प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे ते सुद्धा त्यांच्याच सेक्टरमध्ये. एकाही धारावीकरला विस्थापित होऊ देणार नाही. शिवाय धारावी विनाश मॉडेलचा प्रचार आणि प्रसार करण्यात गुंतलेल्या प्रदीप शर्मा आणि विलास गंगावणे सारख्या पूर्व पोलीस अधिकाऱ्यांनी काहीही केले तरी त्याला धारावीकर बळी पडणार नाहीत, असेही वर्षा गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.