ठाणे  : प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष, जादा गाड्या सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यावर श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी आसूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच  असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी तीन महिने आधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वेप्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे १३०० हुन अधिक वारकऱ्यांना अयोध्यावारीला मुकावे लागले आहे.

ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे १२०० हुन अधिक वारकऱ्यांनी नवे नोंदवली होती. सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष  विलास महाराज फापळे यांनी  रेल्वे भाड्यापोटी सुमारे ४९ लाखपैकी आगाऊ ९ लाख रुपये भरुन रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती. याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे साडे तीन लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या. सर्व यात्रेकरू २२ मी रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक १५ मे रोजी तुमचे आरक्षण रद्द करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने विलासमहाराज फापळे याना कळवले. रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलासमहाराज फापळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तरप्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून. याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असे  सांगितले.  वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

त्यानुसार विलासमहाराज फापळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि इ मेल द्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. परंतु दिल्लीकरांनी मात्र  काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठणयातील वारकऱ्यांना रामल्लाच्या  दर्शनाला मुकावे लागल्याची खंत विलासमहाराज फापळे यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचे फापळे म्हणाले. यावेळी प्रा. वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजीबुवा महाले, अरविंद सावंत आणि इतर यात्रेकरू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *