स्वाती घोसाळकर
मुंबई : येत्या ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल काहीही लागला तरी राज्यात उलथापालथ होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. भाजपाप्रणित महायुतीने राज्यात बाजी मारली तर महविकास आघाडीत बंड अटळ आहे. आणि महविकास आघाडीने बाजी मारली तर महायुतीत असणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटात बंड अटळ असल्याचे म्हटले जात आहे. सध्यातरी विविध वृत्तवाहीन्यांच्या अंदाजानुसार राज्यात भाजपाच्या मित्रपक्षांना जास्त फटका बसणार आहे. या पार्श्वभुमीवर पक्षात जास्त पडजड होऊ नये म्हणून लोकसभा निकालानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्ताराचे आणि महामंडळ वाटपाचे मिशन हाती घेतले जाणार आहेत तसेच तसेच काही मंत्र्यांची खाती बदलली जाणार असल्याची विश्वसनीय बातमी आहे.
पालकमंत्रीपदांचीही अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महामंडळावर अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आली नाही त्यावरही नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे.
या साऱ्या धामधुमीत शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ४ जूननंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट भाजपात प्रवेश करतील असा दावा केला आहे तर, ४ जूननंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षात विलिनिकरण होईल असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळही नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळेच एकुणच महाराष्ट्रातील विविध पक्षांवर बंडाचे ढग पुन्हा दाटू लागले आहेत.
स्थानिक राजकारण, जातीय समीकरण आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन चेहऱ्यांना संधी दिलं जाईल. सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन खाती आहेत, त्यामध्ये बदल होऊन विधानसभेच्या संख्याबळानुसार त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले, संजय शिरसाठ या नेहमींच्या नावांसह अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच आहेत. भरत गोगावले यांनी त्यांची संधी हुकल्याने उघड नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना संधी मिळणार का ते पाहावं लागेल.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडही प्रलंबित असून त्याचाही निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीत त्यांना महामंडळ देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची माहिती आहे.
रिक्त असलेले महामंडळ
– सिडको
– महात्मा फुले महामंडळ
– आण्णाभाऊ साठे महामंडळ
– म्हाडा
– अपंग कल्याण
– चर्मोद्योग विकास महामंडळा
– महाराष्ट्र औद्योगीकरण विकास महामंडळ
– महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ
– महारष्ट्र राज्य वखार महामंडळ
– महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ
– महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
– महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
– महराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
– महिला अर्थिक विकास महामंडळ