यवतमाळ : यंदाच्या निवडणूकीत सर्व्हेनेच आमचा घात केला. सर्व्हेचे कारण पुढे करत माझे तिकीट कापले नसते तर मी दोन लाखांच्या फरकाने निवडूण आले असते असा घरचा अहेर यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी यांनी पक्षाला दिला आहे.
खासदरा म्हणून मी गेल्या 25 वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या भागातील जनतेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखविला आहे. प्रत्येक निवडणुकीत माझे मताधिक्य वाढत गेले आहे. त्यामुळे यावेळी जर सहाव्यांदा मला उमेदवारी मिळाली असती तर, एक लाखाने नव्हे तर दोन लाखाने मी निवडून आले असते. असा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेत्या आणि माजी खासदार भावना गवळी यांनी बोलून दाखवला आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या पराभवावर भावना गवळी यांनी विश्लेषण करत खंतही व्यक्त केली आहे.
लोकसभा मतदारसंघांमध्ये सहाही विधानसभेवर महायुतीचे आमदार होते. मी प्रत्येक वेळी पुसद, दिग्रस, यवतमाळ, राळेगाव, वाशिम आणि कारंजा या मतदारसंघामधून मताधिक्य घेतले होते. यावेळी तसे झाले नाही. तरीसुद्धा पराभव झाला. त्यामळे आता आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. खासदारकीची उमेदवारी नाकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो मला शब्द दिला, तो दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे योग्य ते पुनर्वसन करतील याची मला खात्री असल्याचेही भावना गवळी म्हणाल्या.
