१८ वी लोकसभा गठीत करण्यासाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले. देशात आणि महाराष्ट्रातही सत्ताधारी महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी गोटात अस्वस्थता आहेच. याच अस्वस्थतेचा परिपाक म्हणून काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊन पूर्ण वेळ संघटनेसाठी देण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार महायुतीचे नेतृत्व ते करत होते. बहुतेक सर्व निर्णय त्यांनीच घेतले. त्यामुळे या अपयशाची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारायचे ठरवले आहे. अजून चार महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका लक्षात घेता आता पक्ष संघटना बांधण्याची गरज आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारण्याची गरज आहे.त्यामुळेच आपण पक्षश्रेष्ठींना विनंती करणार आहोत की आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळे करा. आपण पक्षसंघटना बांधून यावेळी ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून आपण विधानसभेला सामोरे जाऊया, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
तसा विचार केला तर फडणवीसांचा हा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल. साधारणपणे यशाला खूप मायबाप असतात, मात्र अपयशाचे पालकत्व स्वीकारायला कोणीच तयार होत नाही. अशा परिस्थितीत फडणवीसांनी स्वतः अपयशाची जबाबदारी स्वीकारत पदावरून बाजूला होत पक्ष बांधणीसाठी वेळ देण्याचे जाहीर केले हे चांगलेच झाले.
मात्र पक्ष स्तरावरच त्याला विरोध आहे. काल फडणवीसांची पत्र परिषद आटोपताच लगेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्र परिषद घेऊन फडणवीस यांनी पाय उतार होण्याची गरज नाही, असे जाहीर केले. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही निवडणुकीतील यश अपयश ही एकट्या फडणवीसांची जबाबदारी नाही, तर तर ती सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे एकट्या फडणवीसांनी राजीनामा देण्याची गरज नाही त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर कायम राहावे, आपण संयुक्तपणे विधानसभा निवडणुकांनाही सामोरे जाऊ आणि अपेक्षित यश मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
फडणवीस हे एक कुशल संघटक आहेत यात कोणताही वाद नाही. आपल्या कौशल्याचे प्रत्यंतर त्यांनी वेळोवेळी दिलेले आहे. २०१३ मध्ये त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अवघ्या वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि पुढे चार महिन्यात विधानसभा निवडणूक ही लागल्या. दोन्ही वेळी फडणवीस यांनी आपले संघटन चातुर्य दाखवत भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. विशेषतः विधानसभा निवडणुकांच्या वेळेस ऐन अर्ज दाखल करण्याच्या तोंडावर शिवसेनेची असलेली युती तोडावी लागली. तरीही अवघ्या दोन दिवसात संपूर्ण राज्यातील सर्व जागांवर फडणवीसन उमेदवार उभे केले आणि चक्क १२२ उमेदवार विजयी करून दाखवले. त्या वेळचे यश ही फडणवीसांची एक हाती कामगिरी होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. नंतर शिवसेनेची साथ घेतली. शिवसेनेनेही काही सुखासुखी साथ दिली नव्हती. तरीही शिवसेनेचे सर्व नखरे सांभाळून घेत कधी आंजारुन गोंजारून तर कधी दणका देत त्यांना सांभाळले, आणि महाराष्ट्राचा राज्यशकट यशस्वीरित्या हाकला होता. जर फडणवीस नसते तर हे शक्य झाले नसते.
हे मुद्दे लक्षात घेतले तर फडणवीस पूर्ण वेळ संघटनात्मक बांधणीसाठी पुढे झाले तर पक्षाची कामगिरी विधानसभेत निश्चित सरस राहील यात शंका नाही. ते पक्षस्तरावर सर्वांना कामाला लावतील आणि महायुतीतील घटक पक्षांनाही सांभाळून घेत पुढे नेतील यात शंका नाही.
मात्र असे जर झाले तर शासन स्तरावर काही समस्या निर्माण होऊ शकतात.आज मंत्रिमंडळात एका बाजूला एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्यासारखा तोडफोड माणूस, अशा दोघांनाही सांभाळून घेत त्यांनी गेली दोन वर्ष राज्यकारभार सुरळीतपणे चालवला आहे. जर आज विधानसभेच्या निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या आहेत. अशावेळी काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्यावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत जर फडणवीसनसारखा कुशल कर्णधार सरकारमधून बाजूला झाला तर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः निवडणुकीला फक्त चार महिने बाकी आहेत. अशावेळी कोणताही गोंधळ झाला तर तो निस्तरायला फारसा वेळ मिळणार नाही, आणि त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसू शकतील, हा धोकाही लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे फडणवीसंना उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला करणे हे देखील अडचणीचे ठरू शकते,
देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. असे असले तरी पक्षाने यातील व्यावहारिक बाजूही बघायला हवी. तरच या सर्व उलथापालथीतून काहीतरी चांगले हातात येऊ शकेल.
अर्थात फडणवीस यांनी राजीनामा देतो असे जाहीर करतात लगेचच त्यांचे राजकीय विरोधक सक्रिय झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, कॉंग्रेसचेविजय वडेट्टीवार सुषमा अंधारे प्रभूतींनी आपापले तारे तोडलेले आहेत. अर्थात तसा विचार केला तर हा भाजपाचा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे या नेत्यांच्या या कोल्हेकुईकडे फारसे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही.
लोकसभा निवडणुकीचे लागलेले अनपेक्षित निकाल बघता राजकीय वर्तुळात काही ना काही उलटे सरळ घडणार हे अपेक्षित होतेच. त्यानुसार हे घडलेले आहे याला विरोधक फडणवीसांचे राजीनामा नाट्य म्हणतीलही. मात्र त्यांचे स्वपक्षीय फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये अशाच मताचे आहेत‌. मिळालेल्या माहितीनुसार दस्तूर खुद्द अमित शहा यांनीही प्रत्यक्ष चर्चा करूनच निर्णय घेऊ असा निरोप फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे यातून जे काही घडेल ते महाराष्ट्राच्या हिताचे घडावे इतकीच प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *