भर रस्त्यात गुंडागर्दी
उल्हासनगर : विकलांग व्यक्तीला एक स्थानिक गुंड मारहाण करीत असताना त्याच्या बचावासाठी गेलेल्या इसमाला सदर गुंडाने बेदम मारहाण केली.यावेळी आरोपीने आरडाओरड करून रस्त्यात दहशत माजवली त्यामुळे घाबरून दुकानदारांनी दुकाने बंद केली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या गुंडाच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्हासनगर -3 येथील कल्याण – कर्जत महामार्गावर असलेल्या फालवर लाईन परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास संजय गजानन जाधव ( 42 ) हा व्यक्ती जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेला होता. यावेळी ताडी माडी केंद्र जवळ यश जजवंशी उर्फ गोल्या हा गुंड प्रवृत्तीचा इसम एका विकलांग व्यक्तीला मारहाण करीत होतो. हा प्रकार बघितल्यानंतर संजय जाधव विकलांगाच्या मदतीसाठी मोटरसायकल वरून खाली उतरला आणि त्याने मध्यस्थी करून विकलांग व्यक्तीला कशाला मारहाण करतोस असे बोलून यश याला बाजूला केले. यानंतर संजय जाधव मोटरसायकलने जात असताना काही अंतरावरच अशोक अनिल थिएटर जवळ यश याने त्याची मोटारसायकल थांबवली आणि शिवीगाळ करून हातातील दगडाने संजयच्या नाकातोंडावर दगडाने प्रहार केला यामुळे संजयच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याचा एक दात पडला.
दरम्यान हा प्रकार होत असतांना यश हा भर रस्त्यावर आरडाओरड करून मी इथला भाई आहे कोणी मध्ये येऊ नका असे म्हणून तेथे दहशत माजवली, यामुळे घाबरून आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली तर फेरीवाले देखील घाबरून पळून गेले.
या प्रकरणी फिर्यादी संजय जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी यश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आव्हाड हे करीत आहेत.
