वसई : पावसाळ्यात वादळी वारे वाहून सोसायट्यांतील खासगी जागेतील मोठे वृक्ष उन्मळून पडणे अथवा त्यांच्या फांद्या तुटणे आदी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिककडून प्रभाग समितीनिहाय वृक्ष प्राधिकरण विभागाचे १० नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. वृक्ष उन्मळून पडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. या वेळी अनेकदा मालमत्तेची हानी होते, रस्त्यावर झाड पडल्यास वाहतूक ठप्प होते. या वेळी महापालिकेकडून वृक्ष बाजूला करण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाते. पावसाळ्यात अशा घटना घडू शकतात, यासाठी नागरिकांना सतर्क करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र १० कक्ष तयार करण्यात आले असून संपर्क क्रमांकदेखील जाहीर केले आहेत.

सोसायटीतील खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्वरित दखल घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पावसाळ्यात वृक्षांसबंधांत काही समस्या उद्‍भवल्यास नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अथवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा. नागरी समस्यांची तत्काळ उकल करण्यात येईल.

– प्रियंका राजपूत, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *