तहसीलदर कार्यालयात केलं शृंगार त्याग आंदोलन
वसई तालुक्यातील वासळई येथे तीन दिवसापूर्वी तलाठी कार्यालयात महिलेवर विनयभंग करण्याचा प्रयत्न तलाठ्याने केल्याच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतात. याप्रकरणी आज वसईतील महिलांनी वसई तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने शृंगार त्याग आंदोलन केले.
यावेळी त्या तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी करत शासनाला शृंगार भेट देण्यात आला. यावेळीराज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले. या घटनेची नोंद घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
फेरफार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वासळई-सजेतील तलाठ्याने विनयभंग केल्याची घटना घडली असून, या तलाठी विशाल करे याला वसई पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र त्याची जमीनावर लगेच सुटका झाली. या प्रकरणी प्रारंभापासून वसई पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा निषेध आणि संबंधित तलाठ्याच्या निलंबनाच्या मागणीसाठी वसईतील महिला संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेंच सामान्य वसईकरांतर्फे वसई तहसीलदार कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात आला.
तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याच्या निलंबनाची मागणी यावेळी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे महिला तर्फे करण्यात आली. तसेच राज्याचे गृहमंत्री आणि महसूलमंत्र्यांना याबाबतचे निवेदन आणि शृंगार तहसीलदार यांना देण्यात आला. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा वसई पोलीस ठाण्यावर नेला होता. त्यांनाही विनयभंग केलेल्या तलाठ्याला तातडीने जमीन कसा मिळाला अशी विचारणा केली. तर पोलिसांच्या वतीने आता तलाठ्याच्या जामीन रद्द करण्या बाबत न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे आश्वासन महिलांना दिले आहे.
तहसीलदार कार्यालयावर आंदोलन सुरु असतानाच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचा फॅक्स आल्याचे सांगण्यात आले. आजच्या मोर्च्यात वसईतील सर्वच पक्षातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉमनिका डाबरे, माजी नगरसेविका किरण चेंदवणकर ,वेरोनिका रिबेलो , सिता जाधव, रश्मी राव, साधना डिक्रूज, वेरोनिका डाबरे, मिलिंद खानोलकर,ऍड. सुमित डोंगरे यांच्या सह मोठ्या प्रमाणत महिला सहभागी झाल्या होत्या.