नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू शकतात. अर्थमंत्री १ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काही वेळापूर्वी एक निवेदन जारी केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, १८ व्या लोकसभेचं पहिलं सत्र येत्या २४ जूनपासून सुरू होईल. पहिलं अधिवेशन सुरू होताच सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाईल. तसेच लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ही महत्त्वाची कामं उरकली जातील.
सर्व नवीन खासदारांचा शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तसेच पुढील पाच वर्षांसाठी नव्या सरकारचा संकल्प सादर करतील.