मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक
ॲड. परब यांना विजयी करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक संकल्पपत्राचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मातोश्री’ येथे बुधवारी प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना वचनबद्ध असून उच्चशिक्षीत उमेदवार ॲड. अनिल परब यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदवीधर मतदारांना यावेळी केले.
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील चार जागांची निवडणूक जाहीर झालेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून ‘महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेना नेते ॲड. अनिल परब आहेत. संकल्पपत्र प्रकाशनावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली ५ वेळा या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विजयी होत आलेला आहे. मुंबईकर आणि शिवसेना यांचे एक दृढ नाते आहे. मुंबईतील पदवीधर मतदारांसाठी ॲड. अनिल परब यांनी विविधांगी कार्य करण्याचा संकल्प वचननाम्यात दिला आहे. शिवसेना पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत ॲड. अनिल परब यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. २६ जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान आहे. मात्र, या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे मतदान चुकवू नका. मतदान करुनच कामावर जा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदवीधर मतदारांना केले.
यावेळी ॲड. अनिल परब म्हणाले की, मी शिवसेनेचा आमदार म्हणून तीनवेळा विधानपरिषदेत कार्य केले. मात्र, यावेळी मी प्रथम पदवीधर मतदारसंघात उभा आहे. माझ्या संकल्पपत्राचे प्रकाशन माझे पक्षप्रमुख आणि मतदार असलेले उद्धव ठाकरे यांच्या हस्त होत असल्याचा मला मोठा आनंद आहे. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे संकल्पपत्राच्या प्रकाशनाला येथे उपस्थित आहेत. मुंबई पदविधर मतदारसंघात प्रचंड मताधिक्क्याने निवडून येण्याचा शिवसेनेचा विक्रम आहे. ९८ टक्के इतके विक्रमी मताधिक्य शिवसेनेने या मतदारसंघात मिळवलेले आहे. यावेळीसुद्धा मोठे मताधिक्य घेत मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहील, असा ठाम विश्वास ॲड. अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे ॲड. अनिल परब यांच्या विरोधात मुंबई पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे डॉ. दिपक सावंत की भाजपचे किरण शेलार उमेदवार असणार आहेत, याविषयी अद्याप काहीच निश्चितता नाही. परब यांचे संकल्पपत्र दोन पानी असून ते मराठी व इंग्रजीमध्ये आहे. त्यामध्ये ॲड. अनिल परब यांनी आपला परिचय दिलेला असून त्यामध्ये मुंबईतील पदवीधरांसाठी हेल्प डेस्क ते वसतीगृह सुविधा असे नियोजित कामांची सविस्तर यादी येथे दिलेली आहे.
