सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश

राज भंडारी

पनवेल : सन २०१९ पासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्नाने ग्रासले होते. त्यातच करंजाडे ग्रामपंचायतीत दीड वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. सरपंच मंगेश शेलार हे मुळातच पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊनच निवडणुकीला सामोरे गेले होते. अखेर करंजाडेचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या आठवडाभरात करंजाडेकरांना उच्चदाबाने मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे.
गेली अनेक वर्षे सतावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा दिला असल्याची माहिती करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी गुरुवारी (दि.१३ जून) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीला करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह जेष्ठ नेते कर्णा शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. करंजाडेचा पाणी प्रश्न निकालात न निघाल्यास पावसाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर सिडकोचे एमडी श्री.सिंगल व पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांनी येत्या चार दिवसांत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नवीन जलवाहिनीतून करंजाडेचा पाणीपुरवठा सुरू करतो, जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे आश्वासन दिले.
यावेळी एमजेपीच्या अधिकार्‍यांनीसुद्धा नवीन लाईनवरून पाणीपुरवठा सुरु करण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच करंजाडे व पुनर्वसन नोडमधील रहिवाशांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मंगेश शेलार यांनी माहिती दिली. तसेच यावेळी नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करीत नागरिकांचे आभार मानले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *