चिपळूण : महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांचे वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष विष्णु सावर्डेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या चारही कृषि विद्यापिठाच्या संयुक्त संशोधन आणि विकास समिती परिषद २०२४ च्या उद्घाटनपर कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे हास्ते हा पुरस्कार देऊन डॉ. सावर्डेकर यांना गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, विलासराव देशमुख मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार किरण सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सावर्डेकर यांनी ९ कोटी रू. अनुदानाचे देशपातळीवरील आणि राज्यपातळीवरील संशोधन प्रकल्प राबविले असून त्यामधून क्षारप्रतिकारक भाताची पनवेल-३, उतीसंवर्धन तंत्रज्ञानापासून प्रथमच नाचणीची अधिक पोषणमुल्य असलेली दापोली २ आणि इतर ७ पिकांच्या जाती विकसित केल्या आहेत. त्याचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये २०-२५ % वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी उतीसंवर्धन क्षेत्रासाठी ५ शिफारशी दिल्या असून कोकणामध्ये प्रथमच उतीसवर्धीत केळी, बांबू, आणि शोभिवंत वनस्पतींची मोठ्या प्रमाणात रोप निर्मिती केली आहे आणि कोकणातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
आपल्या २८ वर्षाच्या सेवेत डॉ. सावर्डेकर यांनी १०३ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील जर्नलमध्ये प्रसिध्द केले आहेत. त्यांनी ५ आचार्य पदवीच्या आणि ३५ पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून ४५० युवकांना उतीसंवर्धनाचे प्रशिक्षण दिलेले आहे. नुकतेच त्यांनी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देशांचा दौरा केला असून तेथे आत्मसात केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भातावर तणनाशक सहन करणाऱ्या भात जाती विकसित करण्यासाठी संशोधन करीत आहेत. दुरदर्शन, आकाशवाणी, नियतकालीके तसेच दैनिकांमधून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार डॉ. सावर्डेकर यांनी केला आहे. यापुर्वी डॉ. सावर्डेकर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय ७ पुरस्कार मिळाले आहेत.
हा पुरस्कार मिळल्याबद्दल विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, आमदार शेखर निकम, महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, संदीप राजपुरे तसेच विद्यापीठ परिवारातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी डॉ. सावर्डेकर यांचे अभिनंदन केले आहे.
