निवासी डॉक्टर आक्रमक

 

मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली असून याप्रकरणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास शस्त्रक्रिया विभागातील कक्षात कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. मागील वर्षभरात महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांवर सात ते आठ वेळा हल्ले झाले आहेत. अशा हल्ल्यामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण होतोच, पण रुग्णसेवेमध्येही व्यत्यय येतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्यावर अद्यापपर्यंत काहीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
परिणामी, वारंवार डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी. निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्ण सेवा करत असतात. त्यामुळे त्यांना अशा हल्ल्यापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे, अशी माहिती ‘केंद्रीय मार्ड’चे अध्यक्ष अभिजित हेलगे यांनी दिली.
दरम्यान, सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांवर आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशाराही ‘मार्ड’ने सरकारला दिला आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *