मुंबई : भगवा रंग हा शिवछत्रपतींचाच आहे, छत्रपतींच्या भगव्यावर कोणतेही चिन्हा छापू नका, चिन्ह छापून भगवा तुमचा होत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावत येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मशाल घरोघरी पोहचवा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वर्धापन दिनानिमित्त जमलेल्या शिवसैनिकांना केले. मुंबईत भगव्यावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह छापून ते मुंबईभर लावले होते. त्याचा समाचार आज ठाकरे यांनी घेतला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालंय. फक्त उध्दव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी “बिनशर्ट” पाठींबा दिला, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. आता फक्त ते उघडे व्हायचेच बाकी होते अशी मिश्किल टीपणीही ठाकरे यांनी केली.

सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणं, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणं हा शासकीय नक्षलवाद आहे, असे शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या विरोधात चुकीचा प्रचार शहरी नक्षलवाद्यांनी केला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, त्याला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.

मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाणचिन्ह न घेता आणि शिवसेना  नाव न लावता निवडणूक लढा.  माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभासाठी मोदी तुम्ही सभा घ्या.. या मिंदेला बाजूला ठेवा, असे ठाकरे म्हणाले.

आता लढाई सुरू झालीय, शेवटचा विजय मिळे पर्यंत थांबायचं नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की किती वेळ अजून निकालाला लागणार आहे. ही कायदेशीर लढाई वैयक्तीक नाही संविधान वाचवण्याची आहे, असे ठाकरे म्हणाले. गेल्या आठवड्यात मविआची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले. पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित या सर्वांना, मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो.

सलामीला भास्कर जाधव, मधल्या फळीत संजय राऊत यांनी भाषणं केली. आता शेवटचा बोलर फलंदाजीला आल्यावर काय परिस्थिती होते, तशी अवस्था माझी झाली आहे. शेवटी आलो असलो तरी जमलेल्या माझ्या लढावाय्या शिवसैनिकांनो अशी साद शिवसैनिकांना घालताच उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांच्याय गजरात आणि घोषणांनी त्याला प्रतिसाद दिला.

लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे. मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुम्हालाला कोणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार.  ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *