ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ठाण्यात संततधार सुरुच राहील्यामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली. पहाटेपासूनच शहराच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. यात काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाली, त्यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले. सांयकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४५ मीमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे दिव्यात पावसाने येथील रहिवाशांची चांगलीच दाणादाण उडविली. नाल्यांची सफाई नीट न झाल्याने सकाळच्या सत्रात झालेल्या पावसाने येथील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले होते. तर काही रहिवाशांच्या घराच शिरल्याचे दिसून आले.

जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. परंतु, बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे ठाणे महापालिका हद्दीत नऊ ठिकाणी पाणी साचले होते. यात पेढ्या मारुती रोड, कापूरबावडी नाका, गणेश नगर दिवा, विवियांना मॉल परिसर, धर्मवीरनगर मुंब्रा रेतीबंदर, दिवा मन्नत बंगला, चांद नगर, सम्राट नगर आदी ठिकाणी पाणी साचले होते.  येथे महापालिकेच्या वतीने पंप लावून पाण्याचा उपसा करण्यात आला. तर या पावसाने शहरात पाच झाडे पडली तर सात ठिकाणी झाड्यांच्या फांदया पडल्या होत्या. सात झाडे धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. झाडाच्या फांद्या पडल्याने सावरकर नगर येथे दोन आणि नौपाडा येथे एक अशा तीन वाहनांचे नुकसान झाले. तर सावरकर नगर येथील दुर्घटनेत उत्तम पाटील हे अग्निशमन दलाचे जवान किरकोळ जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *