ठाणे  : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि.01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अर्ज करावे. तसेच सर्व मतदारांना मतदार यादीतील आपले नाव तपासण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दि. 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाद्वारे घोषित करण्यात आलेला आहे. सदरचा कार्यक्रम दोन टप्यांमध्ये होणार आहे. प्रथम टप्पा हा पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमाचा असून हा कार्यक्रम मंगळवार दि. 25जून 2024 ते बुधवार दि.24 जुलै 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची कुटुंबप्रमुखामार्फत पडताळणी करणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी दि.01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे दुबार नावे, मयत व स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नावांची वगळणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. मतदारांना या कालावधीत मतदार यादीतील त्यांच्या नावाच्या नोंदणी मधील चुकीची दुरुस्ती देखील करून घेता येईल. तसेच या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, मतदार यादीतील त्रुटींची दुरुस्ती, मतदारांचे चांगल्या दर्जाचे फोटो अद्यावत करणे इत्यादी बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा हा गुरुवार दि.25 जुलै 2024 ते मंगळवार दि. 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये दि.25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून दि.25 जुलै 2024 ते दि.09 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती दाखल करून घेण्यात येणार आहेत. दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकतींवर निर्णय घेऊन दि.20 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *