भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेच्या मिडिया प्रमुख श्वेता शालिनी यांनी वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांना आपली व्यक्तिगत बदनामी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्याच्या प्रकरणामुळे काल महाराष्ट्रातील माध्यम वर्तुळात आणि त्याचबरोबर राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडाली होती. नंतर संध्याकाळपर्यंत श्वेता शालिनी यांनी ती नोटीस मागे घेतल्याची ही बातमी आली त्यामुळे अजूनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अजूनही चर्चा सुरूच आहेत.
झाले असे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची चांगलीच पीछेहाट झाली. या पीछेहाटीची कारणमीमांसा करताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी खोटे नॅरेटिव पसरवले आणि ते खोडले गेले नाहीत अशी कबुली दिली होती. त्यामुळे मग प्रश्न असा निर्माण झाला की भारतीय जनता पक्षाजवळ इतकी सुसज्ज यंत्रणा असतानाही हे नॅरेटिव्ह खोडून का काढले गेले नाहीत. त्यावरून मग वाद प्रतिवाद सुरू झाले होते.
भाजपमध्ये हे वाद प्रतिवाद सुरू असतानाच राज्यातील भाजप समर्थक आणि विरोधक पत्रकार स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक देखील व्यक्त व्हायला सुरुवात झाली होती. भरीस भर या पीछेहाटीमुळे दुखावलेले भाजप कार्यकर्ते सुद्धा आपापसात बोलू लागले होते. या सर्वांचा रोख योगायोगाने चुकीचे नॅरेटिव याकडेच वळत होता. हा मुद्दा लक्षात घेत एरवी भाजप समर्थक असलेले काही युट्युबर पत्रकार जसे भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, आबा माळकर, अनय जोगळेकर प्रभृती देखील बोलते झाले. आणि त्यांचे व्हिडिओ युट्युब वर प्रसारित होऊ लागले. त्यात भाऊ तोरसेकर यांनी महाराष्ट्र भाजपमधील दिव्या स्पंदना कोण? अशा आशयाचा एक व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओमध्ये भाऊंनी एकूणच महाराष्ट्र भाजपची विद्यमान माध्यम व्यवस्था कशी बिघडली आहे याचे यथास्थिती वर्णन केले होते. त्यामुळेच श्वेता शालिनी दुखावल्या आणि त्यांनी सरळ भाऊंना वकिलामार्फत नोटीसच पाठवली. नंतर काही तासातच त्यांनी ती परत घेतली. काही वृत्तवाहिन्यांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्वेता शालिनी यांना समज दिल्यामुळे त्यांनी ती नोटीस मागे घेतली आहे. मात्र अशी नोटीस मागे घ्यावी लागणे हे देखील नामुष्कीचेच लक्षण आहे.
काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील माध्यमव्यवस्था ही आदर्श मानली जात होती. त्याला कारणही तसेच होते. या माध्यम व्यवस्थेत भाजपचे माध्यमांशी संबंधित जुने निष्ठावंत कार्यकर्ते जोडले गेले होते. भाजपसोबतच संघ वर्तुळातीलही असे निष्ठावंत कार्यकर्ते या कामात सक्रिय होते. त्यावेळी या व्यवस्थेत व्यक्तिगत स्नेहबंधांचा ओलावाही होता.
मात्र मधल्या काळात भारतीय जनता पक्षात नको तेवढा प्रोफेशनॅलिझम बोकाळला. त्यामुळे प्रत्येक कामासाठी प्रोफेशनल एजन्सीच्या सेवा भरमसाठ पैसे देऊन घेतल्या जाऊ लागल्या. इथे उन पावसाची पर्वा न करता वण वण फिरणारा तळागाळातला कार्यकर्ता बाजूला फेकला गेला. आणि हस्तीदंती मनोऱ्यात बसणारे पगारी प्रोफेशनल एक्सपर्टस भाजपाला सेवा देऊ लागले.
अनेक ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांच्या मतानुसार ही प्रोफेशनल व्यक्तींची सेवा घेण्याची पद्धतच भाजपला आजच्या स्थितीत आणून ठेवणारी ठरलेली आहे. श्वेता शालिनी या देखील या प्रोफेशनल व्यवस्थेतूनच आलेल्या आहेत. आणि अशा व्यवस्थेच्याच त्या पुरस्कर्त्या आहेत. त्यामुळे पक्षाचा अवास्तव पैसा खर्च झाला. मात्र हाती काहीही लागले नाही असा आरोप पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते खाजगीत करतात. पक्षाच्या माध्यम व्यवस्थेत सक्रिय असलेल्या एका जुन्या कार्यकर्त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर माहिती दिली की सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्र प्रदेश भाजपची माध्यम व्यवस्था आदर्श मानली जात होती. आज तिच्यात सुधारणेला खूप वाव आहे.
प्रोफेशनॅलीझमच्या नादाने काही वेळा कसा धोका होऊ शकतो याचे एक उदाहरण वाचकांना तिथे द्यावेसे वाटते. १९८४-८५ पर्यंत काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींचे राज्य होते. इंदिरा गांधी देखील व्यक्तिगत संबंधांना महत्त्व देणाऱ्या होत्या. त्यांनी माणसे जोडली होती. १९८४ च्या ऑक्टोबर महिन्यात इंदिराजींची हत्या झाल्यावर त्यांचे सुपुत्र राजीव गांधी देशाचे पंतप्रधानही बनले, आणि काँग्रेसचे अध्यक्ष देखील झाले. लगेचच जानेवारी १९८५ मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीची प्रचार यंत्रणा राजीव गांधींच्या संकल्पनेनुसार राबवली गेली होती. राजीव गांधी हे देखील डून स्कूल संस्कृतीतून आलेले आणि प्रोफेशनॅलीझमचे पुरस्कर्ते होते. त्यांनी प्रचार यंत्रणा राबवण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले. त्यावेळी तर काँग्रेसला घसघशीत यश मिळाले, कारण इंदिराजींच्या हत्येचा इम्पॅक्ट कायम होता. मात्र त्यानंतर
१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींनी हीच संकल्पना वापरून प्रचार यंत्रणा राबवली. तेव्हा मात्र काँग्रेसला चांगलाच फटका बसला. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. तत्कालीन नोंदीनुसार काँग्रेसला २०० पेक्षाही कमी जागा मिळाल्या होत्या. एकूणच काय तर प्रोफेशनॅलीझमचा हा अति आग्रह कधी कधी धोक्याचाही ठरू शकतो. महाराष्ट्रात भाजपच्या बाबतीत यावेळी हा हट्टच अडचणीचा ठरला असावा असे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्ष समर्थक माध्यम तज्ञ खाजगीत बोलत आहेत.भरीस भर आपण कुठे चुकलो हे न शोधता भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकारितेतील भीष्म पितामह व्यक्तीला नोटीस बजावणे हा तर पोरकटपणाच झाला. त्यामुळे भाजप प्रदेश माध्यम यंत्रणेचे जास्तीच हसे झालेले दिसते आहे. इथे संबंधित व्यक्तींनी भाऊ तोरसेकर यांना भेटून आपली बाजू समजावून सांगितले असते तर उभयपक्षी सन्मान कायम राहिला असता.
हे सर्व प्रकार लक्षात घेत आता प्रदेश भाजप नेतृत्वाने दिल्ली, कलकत्ता, बंगलोर, किंवा अहमदाबादहून आयात केलेले माध्यम तज्ञ सेवेत न घेता पक्षाचेच जे जुने समर्थक तज्ञ कार्यकर्ते आहेत अशांना सोबत घेऊन या निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदेश भाजपने ४० प्रवक्त्यांची चमू तयार केली होती. मात्र निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांच्या खोट्या नॅरेटिवंना उत्तर देण्यासाठी यातला एकही प्रवक्ता समोर येताना दिसत नव्हता. काल घडलेल्या या घटनेसंदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीने एक चर्चा आयोजित केली होती.या चर्चेत भाजपची बाजू मांडायला एक या प्रवक्त्या उपलब्ध नव्हता असे सांगण्यात आले.या प्रवक्त्यांना माध्यम प्रमुखांकडून किंवा इतर कोणी वरिष्ठांकडून काही बंधने होती का ही माहिती देखील समोर यायला हवी. पक्षाने अशा सर्व जुन्या जाणकार निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण कुठे चुकलो कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्या चुका तत्काळ दुरुस्त कराव्या, आणि येत्या विधानसभा निवडणुकीत हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे पगारी प्रोफेशनल्स हाताशी न घेता जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन निवडणुकीत उतरावे. तरच भाजपला विधानसभा निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे.
