नवी मुंबई : ‘स्वच्छ शहर’ ही आपल्या नवी मुंबईची ओळख असून ती कायम राखण्यासाठी तसेच स्वच्छतेची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जोडीने महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी सक्रिय व्हावे तसेच आपल्या शहराचा नावलौकिक उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले.
विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ च्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक विभागाने करावयाची कामे तसेच राबवावयाचे उपक्रम याविषयीच्या अपेक्षा तपशीलवार सांगत त्या अनुषंगाने गतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
स्वच्छता कार्यामध्ये नागरिकांचा सहभाग सर्वात महत्वाचा असून नागरिकांनी दररोज आपापल्या घरातूनच    कच-याचे वर्गीकरण करणे व वर्गीकृत कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत वेगवेगळा देण्याची सवय अंगिकारावी याकरिता त्यांच्यापर्यंत सातत्याने हा संदेश पोहचविण्याची गरज आयुक्तांनी विशद केली. तसेच सर्व विभागांमध्ये स्वच्छतेच्या मोहीमा राबवून त्यामध्येही लोकसहभागावर विशेष भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याचप्रकारे एपीएमसी मार्केटमध्येही कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यावर लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. मोठ्या सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर अधिक कृतीशील व्हावे असे निर्देशित करण्यात आले.
शालेय व महाविदयालयीन विदयार्थी हे या शहराचे भविष्य असून त्यांच्या मनावर आत्तापासूनच स्वच्छतेचा संस्कार व्हावा या भूमिकेतून शालेय व महाविदयालयीन पातळीवर स्वच्छता विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे तसेच स्वच्छता शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर व्यापक स्वरुपात राबविण्यात यावा असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
विदयार्थ्यांना आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर पुढे काय प्रक्रिया होते याची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शाळांच्या अभ्यास भेटी आयोजित करण्याची कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आले.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती मोहिमा राबवाव्यात त्याचप्रमाणे दैनंदिन बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे प्रतिबंध करुन त्या ठिकाणी कापडी पिशव्या सहजपणे उपलब्ध होण्यासाठी वेन्डींग मशिन बसवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या. याकामी महिला बचत गटांचे सहकार्य घ्यावे असे सूचित करण्यात आले.
बेलापूर ते वाशी पर्यंत शहरातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून त्यावरून इतर शहरांतील हजारो नागरिक दररोज प्रवास करीत असून त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ज्याप्रमाणे शनिवारी यशस्वीरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ती ठराविक कालावधीनंतर नियमीतपणे राबविण्यात यावी व त्यासोबत शहरातील इतरही मुख्य मार्गांवर स्वच्छता मोहिमा लोकसहभाग घेऊन राबवाव्यात अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
सफाईमित्रांसाठी राबवावयाच्या कल्याणकारी योजनांची कार्यवाही तत्परतेने करावी यामधील विमाविषयक बाबींकरिता पोस्ट ऑफिसचे सहकार्य घेण्यात यावे त्याचप्रमाणे समाजविकास विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेची 10 टक्के अंमलबजावणी 15 ऑगस्टपर्यंत व्हावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
स्वच्छता विषयक कामांचा दैनंदिन आढावा घेता यावा याकरिता स्वतंत्र डॅशबोर्ड असावा अशा सूचना देतानाच स्वच्छता‍विषयक जनजागृतीची व्याप्ती विविध माध्यमांतून वाढविण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये एनएमएमटीच्या बसेसमध्ये फलक प्रदर्शन, उद्घोषणा याव्दारे स्वच्छता संदेश प्रसारित करण्याचे सूचित करण्यात आले.
शहरातील मुख्य चौक, कॉर्नर, उदयाने याठिकाणच्या शिल्पाकृती व्यवस्थित करुन घ्याव्यात व त्याची स्थलनिहाय छायाचित्रे सादर करावीत अशा सूचना देण्यात आल्या. विविध उदयाने, पार्क याठिकाणी स्वच्छतागृहांची तसेच स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जलद कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. उदयानांमधील एका कोपऱ्यात नर्सरी निर्माण करणेबाबत कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय पार्किंग पॉलिसी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद पावले उचलावीत असेही निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *