समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांच्या तक्रारीची ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी घेतली दखल

अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा उपशहरप्रमुख, समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी, युवासेनेचे ओवळा माजीवडा विधानसभा सचिव सागर बैरीशेट्टी, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, संजय मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना ठाण्यातील गावंडबाग क्षेत्रातील टर्फ बाजूच्या इमारतीतील वेदर शेड उडून झालेल्या अपघातामुळे ९ मुले जखमी झाल्याची दुर्घटना कानावर घालून ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी करण्याची तसेच धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याची तत्काळ दखल घेत सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या घेतलेल्या बैठकीत अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा होऊन महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी तसेच धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी.
त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी.महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत.त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश दिले.
वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी ९ मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्यास त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.इतर प्रभागातील ८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *