डोंबिवली : दुकानात झोपेची गोळी नाही, असे कारण औषध खरेदीसाठी आलेल्या खोणी-पलावातील एका रहिवाशाला औषध विक्रेत्याने दिल्याने त्याचा राग येऊन रहिवाशाने आपल्या साथीदार मुलासह औषध विक्रेत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला आहे.
दीपक अमृतलाल करोडिया (५४, रा. लेकसाईड, पलावा, खोणी), दीपक यांचा मुलगा दर्शन (३२) अशी आरोपींची नावे आहेत. खोणी पलावा येथील लेकशोअर ग्रीनमधील संजीवनी मेडिकल दुकानात हा प्रकार घडला आहे. या दुकानातील अंबरनाथ कोहजगाव भागात राहणारा कामगार अजय रामचंद्र स्वामी (३२) यांनी मारहाणप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अजय स्वामी हे संजीवनी मेडिकल दुकानात ग्राहकांना औषध विक्रीची कामे करतात. सोमवारी रात्री दुकान बंंद केले जात असताना दुकानात पलावा भागात राहणारे आरोपी दीपक करोडिया आणि त्यांचा मुलगा दर्शन दुकानात आले. त्यांनी जवळ डाॅक्टरांची औषध चिठ्ठी नसताना औषध विक्रेता अजय यांना झोपेची गोळी मागितली. अजयने झोपेची गोळी नाही असे उत्तर दिले. त्याचा राग दीपक यांना आला. त्यांनी अजय यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा दर्शन याने दुकानात शिरून दुकानात असलेला लाकडी दांडका घेऊन त्या दांडक्याने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *