टोइंग व्हॅनच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर वसुली तूर्तास बंद!
ठाणे : ठाणे शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अजय जेया हे, सुमारे वर्षभरापासून टोइंगच्या माध्यमातून होणारा गैरप्रकार, लोकांसमोर मांडत आलेले आहेत. यासंदर्भात अनेक पीडित वाहनधारक, त्यांचा होणारा मानसिक छळ, कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून विनाकारण उकळले गेलेले पैसे, इत्यादि तक्रारी घेऊन त्यांच्याशी संपर्क साधत असतात. एकीकडे टोइंगच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात गैरप्रकार आणि गैरव्यवहार वाढलेला असताना, दुसरीकडे मात्र, सर्वसामान्य नागरिकांना तसेच, वाहनधारकांना टोइंग व्हॅनच्या साचेबद्ध (S.O.P) कायद्याबद्दल काहीही माहिती नसते. याप्रकरणी किंवा संबंधित गैरप्रकाराविरोधात तक्रार कशी करायची आणि कुठे करायची? यासंदर्भात वाहनधारकांना कोणतीही माहिती नसते आणि म्हणूनच, अशा पीडित वाहनधारकांना व सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने, दि. २८ जून ते ०५ जुलै-२०२४ रोजीपर्यंत, ठाणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अजय जेया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनजागृती सुरु केली असून, या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून, कायदेशीर प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, अजय जेया यांच्या जनजागृती अभियानाचा ठाणे वाहतूक शाखेने चांगलाच धसका घेतला असल्याचे, अभियानाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले आहे. पार्किंगच्या नावाखाली, टोइंगद्वारे कारवाई झालेल्या वाहनधारकांकडून बेकायदेशीरपणे वसुली करण्याचा धडाकाच ठाणे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केला होता. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर, अजय जेया यांनी, माहितीच्या अधिकाराखाली वाहतूक शाखेच्या भ्रष्ट कारभाराच्या अनेक बाबी चव्हाट्यावर मांडल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात, ठाण्यातील टोइंग कारवाई काही प्रमाणात थंडावली होती; मात्र, ती पूर्णपणे थांबली नव्हती. याच अनुषंगाने पीडित वाहनधारकांना व सर्वसामान्य नागरिकांना टोइंग व्हॅनच्या कायद्याबद्दल माहिती असावी, त्याचप्रमाणे संबंधित गैरप्रकाराविरोधात तक्रार कशी आणि कुठे करायची? यासंदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी अजेय जेया आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून, ही जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना अजय जेया म्हणाले की, ज्या पीडित वाहनधारकांची जी काही तक्रार असेल, त्याची व्यवस्थित नोंद घेऊन, ती योग्य त्या विभागाकडे सादर करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास, सदर तक्रारी थेट न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून ज्याठिकाणी टोइंगच्या गाड्या उचलून नेल्या जातात, त्याठिकाणी दोन सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून, त्यांच्याकडून वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर मार्गाबद्दल माहिती देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे, जनजागृती अभियानाच्या पहिल्याच दिवशी, ठाणे वाहतूक शाखेच्या टोइंग व्हॅन, ठाणे शहरच्या रस्त्यांवरुन वसुलीसाठी फिरताना दिसल्या नसल्याने, ठाणेकर नागरिकांकडून आश्चर्य तर, वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. हाच धागा पकडून अजय जेया प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देताना पुढे म्हणाले की, या जनजागृती अभियानाची माहिती प्राप्त होण्यासाठी, रिक्षावर ध्वनीप्रक्षेपक लावून, सदर रिक्षा ठाणे शहरात फिरविण्यात येईल. यासाठी १) कोपरी वाहतूक शाखेच्या शेजारी, ठाणे. (पूर्व), २) ठाणे उपायुक्त वाहतूक शाखा, सर्व्हिस रोड, तीन हात नाका, ३) नितीन कंपनीच्या उड्डाणपुलाखाली, ४) माजिवडा उड्डाणपुलाखाली, ५) वाघबीळ नाका उड्डाणपुलाखाली, ६) ठाणे नगर एसीपी कार्यालयासमोर, ७) राबोडी वाहतूक पोलीस चौकीजवळ, या ठाणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी, दि. ५ जुलै-२०२४ रोजीपर्यंत माझे सहकारी उपस्थित राहून वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना टोइंग व्हॅनच्या माध्यमातून होणारा गैरप्रकार आणि पार्किंग समस्यांसंदर्भात, योग्य ते मार्गदर्शन करतील, अशी माहिती समाजसेवक अजय जेया यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे.