ठाणे : आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरिता आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनश्च: प्रसिध्द करण्यात येणार असल्याने या पदभरती जाहिरातीस तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे आदिवासी विकास आयुक्त नयना मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आदिवासी विकास आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्या स्तरावरून23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. तथापी सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनश्च प्रसिध्द करणे क्रमप्राप्त आहे. बिंदूनामावली अद्ययावत करुन गट-क संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागाची दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेली जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी. बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल, असे नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त नयना मुंडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
