ठाणे : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन 2024-25 या वर्षा करीता सरळ व कौशल्य चाचणीद्वारे खेळाडूंना निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक खेळाडूनी दिनांक 5 जुलै 2024 पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.
निकषामध्ये पात्र खेळाडूंनी जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होण्यासाठी आपले नावे नोंदणी 5 जुलै 2024 पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे करण्यात यावी. खेळाडूचे नाव, जिल्हा, खेळ प्रकार, जन्मदिनांक (जन्मतारखेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट व आधारकार्ड), वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र (राज्य/ राष्ट्रीय स्पर्धा प्रमाणपत्रे )याबाबत माहिती सह नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यलय परिसर, कोर्टनाका, ठाणे येथे करण्यात यावी.
सन २०२४-२५ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील ०९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५०%) व कौशल्य चाचणी (५०% ) प्रक्रियेअंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. ही प्रवेश प्रक्रियेसाठी खालील प्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या क्रीडा प्रबोधिनींमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा 16 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.
सरळ प्रवेश प्रक्रिया:- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे, अश्या खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देवून प्रवेश निश्चत केला जातो.
खेळ निहाय कौशल्य चाचणी :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षा आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
वैद्यकीय चाचणी :- उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारिरीकदृष्ट्या सुदृढ खेळाडूची निवड अंतिम करण्यात येते.
मुंबई विभागांतर्गत जिल्ह्यातून प्रवेशिका नुसार खेळाडूंची खेळनिहाय चाचण्या घेण्यात येतील. विभागस्तरीय क्रीडा कौशल्य चाचणीचे आयोजन दिनांक 8 व 9 जुलै 2024 या दिवशी करण्यात येईल. विभागस्तरावरून निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचा प्रवेश अर्ज राज्यस्तरावरील चाचणीसाठी पाठविण्यात येतील, अशी माहिती ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *