निवृत्त व कार्यरत पोलीसांशी महिन्यांतुन एकदा संवाद साधणार, निवृत्त पोलीस संघटनेसाठी कार्यालय देणार !
अनिल ठाणेकर
ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आता निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसह कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांशी महिन्यांतुन एकदा संवाद साधणार आहेत. तसेच निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघटनेसाठी कार्यालय उपलब्ध करुन देणार आहेत. ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सल्लागार सोपानराव महांगडे, काशीनाथ कचरे, अध्यक्ष माधव माळवे, कार्याध्यक्ष रघुनाथ घरटे या पदाधिकारी यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत पोलीस आयुक्तांनी हे आश्वासन दिले.
ठाणे निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्यासाठी कोणतेही कार्यालय ठाण्यात सध्या उपलब्ध नाही. याबाबतच्या मागणीचे निवेदन ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले. डुंबरे यांनी संघटनेचे निवेदन स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेसाठी कार्यालय उपलब्ध करुन देण्याच्या दिलेल्या निर्देशाची व पोलीस महासंचालक यांनी संघटनेस कमीतकमी दोन खोल्या उपलब्ध करून द्यावा या दिलेल्या निर्देशाचे अवलोकन करून ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेकरिता कायमस्वरुपी कार्यालय उपलब्ध करुन देण्याचे तसेच असे कायमस्वरुपी कार्यालय उपलब्ध होईपर्यंत कापूरबावडी येथे तात्पुरती दोन खोल्यांची जागा कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) रुपाली अंबूरे यांना दिले असल्याची माहिती संघटनेचे सल्लागार काशीनाथ कचरे यांनी दिली.
तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी संघटनेच्या माध्यमातून निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणींची, प्रश्नांची माहिती समजावून घेतली. निवृत्ती पोलिसांच्या अडीअडचणी सोडविण्यााठी निवडणुकीच्या काळात बंद पडलेली दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील पोलीस सभा आता पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन दिले तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सध्या कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा महिन्यातून एकदा भेटून पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे सवांद साधणार आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या परिचयाचे निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व सर्वाँना भेटण्याचे वचनही यावेळी दिले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष माधव माळवे यांनी सांगितले.
000000