अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक कॅरम स्पर्धा
भव्या सोळंकी विजेता मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद विवा कॉलेज-विरारचा राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू भव्या सोळंकीने पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रथमपासून अचूक फटकेबाजीसह आघाडी घेत भव्याने त्याचाच कॉलेज सहकारी जोनाथन बोनालचा ८-२ असा पराभव केला. परिणामी मुंबई उपनगरचा सबज्युनियर विजेता पार्ले टिळक हायस्कूलचा सार्थक केरकर व राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू डॉ. दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेकर यांना सहज हरवून विजयीदौड करणाऱ्या जोनाथनला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गौरवमूर्ती क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित परेल येथे झालेल्या उपांत्य फेरीत भव्या सोळंकीने मयुरेश पवारला १४-१० असे तर जोनाथन बोनालने सार्थक केरकरला १४-२ असे नमविले. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचे मानकरी कौस्तुभ जागुष्टे, प्रसन्ना गोळे, ध्रुव भालेराव व मिहीर शेख ठरले. उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद समीर खान, अथर्व म्हात्रे, अमेय जंगम, निधी सावंत, तन्वी परब, पृथ्वी बडेकर, रुची माचीवले, नेहाल उस्मानी यांनी मिळविले. याप्रसंगी छबिलदास हायस्कूलचे माजी प्राचार्य सतीश इनामदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व मीनानाथ धानजी, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व सुनील खोपकर आदी उपस्थित होते. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक सचिन शिंदे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व क्रीडापटू ओमकार चव्हाण यांनी पंचाचे कामकाज केले.
ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात लागू
ठाणे : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही, ०५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू झाली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
विकलांगाच्या बचावासाठी गेलेल्या इसमावर प्राणघातक हल्ला
भर रस्त्यात गुंडागर्दी उल्हासनगर : विकलांग व्यक्तीला एक स्थानिक गुंड मारहाण करीत असताना त्याच्या बचावासाठी गेलेल्या इसमाला सदर गुंडाने बेदम मारहाण केली.यावेळी आरोपीने आरडाओरड करून रस्त्यात दहशत माजवली त्यामुळे घाबरून दुकानदारांनी दुकाने बंद केली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या गुंडाच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर -3 येथील कल्याण – कर्जत महामार्गावर असलेल्या फालवर लाईन परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास संजय गजानन जाधव ( 42 ) हा व्यक्ती जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेला होता. यावेळी ताडी माडी केंद्र जवळ यश जजवंशी उर्फ गोल्या हा गुंड प्रवृत्तीचा इसम एका विकलांग व्यक्तीला मारहाण करीत होतो. हा प्रकार बघितल्यानंतर संजय जाधव विकलांगाच्या मदतीसाठी मोटरसायकल वरून खाली उतरला आणि त्याने मध्यस्थी करून विकलांग व्यक्तीला कशाला मारहाण करतोस असे बोलून यश याला बाजूला केले. यानंतर संजय जाधव मोटरसायकलने जात असताना काही अंतरावरच अशोक अनिल थिएटर जवळ यश याने त्याची मोटारसायकल थांबवली आणि शिवीगाळ करून हातातील दगडाने संजयच्या नाकातोंडावर दगडाने प्रहार केला यामुळे संजयच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याचा एक दात पडला. दरम्यान हा प्रकार होत असतांना यश हा भर रस्त्यावर आरडाओरड करून मी इथला भाई आहे कोणी मध्ये येऊ नका असे म्हणून तेथे दहशत माजवली, यामुळे घाबरून आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली तर फेरीवाले देखील घाबरून पळून गेले. या प्रकरणी फिर्यादी संजय जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी यश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आव्हाड हे करीत आहेत.
राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान
अशोक गायकवाड मुंबई :राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. तीस (३०) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर ७ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. विनय कारगांवकर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, वाहतूक मुंबई, आशुतोष डुंबरे, आयुक्त ठाणे शहर, अशोक अहिरे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, विनोदकुमार तिवारी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर जिल्हा, प्रल्हाद खाडे, सेवानिवृत्त समादेशक, रा रा पो बल गट क्र. ६, धुळे, चंद्रकांत गुंडगे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नांदेड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई : आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ७ जून च्या रात्री तुर्भे विभागात सेव्हन स्काय बार अँड लोंज, पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, टीप्सीब्रो बारअँड लोंज पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, करिश्मा बार सेक्टर १९ सी. असे एकूण ०३ बार यांनी केलेल्या अनधिकृत बाधकामाविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई स्थानिक पोलीस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार डॉ राहुल गेठे उप आयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेसाठी भरत धांडे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तुर्भे,डॉ अमोल पालवे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी,नेरूळ आणि तुर्भे विभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथकथातील अधिकारी/कर्मचारी यांचासह करण्यात आली. सदर कारवाई पोटी २,५०,०००/- इतके दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले असून यापुढे अशीच कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे : महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अव्वल कारकून संदीप पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.
घाटकोपरमध्ये दुर्गंधीमुक्तीसाठी भूमिगत कचरा पेट्या
मुंबईः आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज हजारो मेट्रिक टन कचरा निर्माण होत असतो. झोपडपट्टी परिसर असलेल्या भागात कचरा मोठ्या प्रमाणात साठत असल्याने दुर्गंधीचा आरोग्यावर परिणाम होतो. रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र पसरत असल्याने परिसरात अस्वच्छता देखील निर्माण होत आहे. त्यामुळे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यावर पालिकेने भर दिला आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते यांनी सांगितले. हा परिसर दुर्गंधीमुक्त आणि कचरा मुक्त होणार असल्याने स्थानिकांकडून पालिकेच्या या धोरणाचे कौतुक होत आहे. स्थानिक आमदार राम कदम यांनी पालिकेकडे याबाबत पाठपुरावा केला होता. जगदुशा नगर येथे महादेव मंदिर, तसेच खेळाचे मैदान असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. अशात झोपडपट्टीतून जमा होणारा कचरा मंदिरासमोरील रस्त्यावर टाकला जात असत. त्यामुळे भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र कचरा पसरत होता. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने अखेर इथे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येत असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाने आभार मानले.
नितीन कंपनी पूलाखालील उद्यान आता कचराभूमी
चालण्यासाठी उद्यानात येणारे नागरिक हैराण ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहने उभी राहू नये. तसेच नागरिकांना चालणे, व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत उद्यान उभारले आहे. या उद्यानामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, क्रीडापटू येत असत. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान ‘डम्पिंग’चा भाग झाल्याचे चित्र आहे. मार्गरोधक, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठविल्या जात आहे. भंगार वाहने, महापालिकेची वाहने देखील येथेच उभी असतात. त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचे चित्र आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपूलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहने उभी करण्यात येत होती. तसेच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अमली पदार्थांची नशा करत होते. त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१७ मध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने या पूलाखाली सायकल ट्रॅक, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरश: कायापालट झाला होता. पाचपाखाडी, नितीन कंपनी, कॅडबरी, खोपट भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती. येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात होते. उड्डाण पुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्ये लिहिलेली होती. रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती. त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पुलाखाली महापालिकेने बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणा ठेवल्या आहेत. उद्यानाखालील सायकल ट्रॅक देखील तोडण्यात आले आहे. उद्यानाखाली काही पत्र्यांचे निवारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होत आहे. तसेच महापालिकेने कारवाई केलेल्या जाहिरातींचे फलक, प्लास्टिकचे तुटलेल्या अवस्थेतील मार्गावरोधक, भंगात दुचाकी आणि मोटारी ठेवल्या आहेत. लाकडी बांबूचा खच पडलेला आहे. काही उद्योग देखील या उद्यानात सुरू झाले आहे. जाहिरात फलकांना लावले जाणारे लोखंडी खांब येथे जोडले जात आहेत. त्यामुळे उद्यानाचा वापर खासगी कंपन्यांकडूनही बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे चित्र आहे. या उद्यानाची अवस्था वाईट झाल्याने चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानाचे बकालीकरण रोखा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार जाधव यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
